जम्मू-काश्मीरमध्ये नवा इतिहास
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये डीडीसी निवडणुकीनंतर नवा इतिहास रचला गेला आहे. पहिल्यांदाच एखाद्या सदस्याने शपथग्रहण सोहळय़ात संस्कृत भाषेचा वापर केला आहे. डीडीसीच्या 4 सदस्यांनी संस्कृतमधून शपथ ग्रहण केली आहे.
उधमपूर जिल्हय़ातून निवडून आलेले परीक्षित सिंग, जूही मन्हास, पिंकी देवी तसेच सांबा जिल्हय़ातील शिल्पा दुबे यांनी देववाणी संस्कृतमधून शपथ घेतली आहे. याचबरोबर बिश्राहचे देवेंद्र कुमार यांनी डोगरी भाषेत शपथ ग्रहण केली आहे. यापूर्वी कधीच संस्कृतमधून शपथ घेण्यात आली नव्हती.
उमेदवारांना शपथ घेण्यापूर्वी भाषेसंबंधी विचारणा करण्यात येते. या विचारणेवेळी 5 जणांनी स्वतःची भाषा संस्कृत तसेच डोगरी असल्याचे कळविले होते. उधमपूर जिल्हय़ातील कार्यक्रमात तीन जणांनी तर सांबामध्ये एका विजयी उमेदवाराने संस्कृतमधून शपथ घेतली आहे. यातील जूही मन्हास उधमपूर येथून निवडून आल्या आहेत. रामनगरच्या भाजप आमदाराच्या त्या पत्नी आहेत. शपथग्रहणानंतर आता पुढील 20 दिवसांमध्ये प्रत्येक जिल्ह्य़ात डीसीसी अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. याचमुळे विविध पक्षांनी अपक्ष तसेच अन्य पक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. भाजप, काँग्रेस, अपनी पार्टी तसेच गुपकारच्या पक्षांनी स्वतःच्या पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. कुणालाच बहुमत न मिळालेल्या जिल्हय़ांमध्ये अपक्षांचे महत्त्व वाढले आहे.









