चिंचली मायाक्कादेवी मंदिरावर आधारित देखावा
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवात भाग घेतलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिंचली मायाक्कादेवी मंदिरावरील चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. शनिवारी यासंबंधीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
विजयादशमीच्या दिवशी झालेल्या जम्बो सवारीत 31 जिल्ह्यांतील विविध खात्यांच्या एकूण 58 चित्ररथांनी भाग घेतला होता. बेळगाव जिल्हा पंचायतीच्यावतीने चिंचली येथील श्री महाकाली-मायाक्कादेवी मंदिरावर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता. कलाकार बी. एस. गस्ती व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या या चित्ररथाचे कौतुक झाले होते. आता त्याला तिसरा क्रमांक मिळाला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी रवी बंगारेप्पन्नावर यांनी दिली.
यासंबंधी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनीही कौतुक केले आहे. जम्बो सवारीत भाग घेतलेल्या 58 चित्ररथांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील मायाक्कादेवी मंदिरावर आधारित चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही गोष्ट जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.









