वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाचा 39 वा स्थापना दिन येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंचा तसेच प्रशिक्षकांचा साई संस्था पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे मंत्री अनुराग ठाकुर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये 2022 साली पद्मश्री पुरस्कार मिळविणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा साईतर्फे खास गौरव करण्यात आला. अनुराग ठाकुर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. गुरुचरण सिंग- क्रिकेट, कॅप्टन श्रीराम सिंग- अॅथलेटिक्स, राणी रामपाल- हॉकी, मरियप्पन- पॅरा अॅथलिट, दिवंगत एन. डिंको सिंग- मुष्टियुद्ध. डिंको सिंग यांच्या पत्नी बबाई देवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच अलीकडेच महिलांच्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या चार महिला मुष्टियोद्ध्या- निखत झरीन, नितू, लवलिना बोर्गोहेन आणि सविती बोरा यांचा खास गौरव करण्यात आला. विविध क्रीडा प्रकारातील 16 सर्वोत्तम प्रशिक्षकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.









