वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाने मंगळवारी स्पेनमधील आगामी पाच देशांच्या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने पुऊषांच्या राष्ट्रीय शिबिरासाठी 39 सदस्यीय खेळाडूंच्या मुख्य गटाची निवड केली आहे. दुसरीकडे, मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी पुढील वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने ‘नवीन दृष्टिकोन’ पत्करण्याची गरज व्यक्त केली आहे. हांगझाऊ आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक जिंकून थेट पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय पुऊष हॉकी संघ 15 डिसेंबरपासून व्हॅलेन्सिया येथे सुरू होणाऱ्या पाच देशांच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
विश्वविजेता जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम आणि यजमान स्पेन हे या स्पर्धेतील इतर संघ आहेत. पुऊष खेळाडूंचे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर आज बुधवारपासून बेंगळूर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात सुरू होत आहे. हांगझाऊ आशियाई क्रीडास्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्यानंतर बऱ्याच काळाने राष्ट्रीय शिबिर होत आहे. संघातील बहुतेक खेळाडू चेन्नईमध्ये झालेली राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले आहेत आणि मलाही त्यामुळे काही तऊण आणि उगवत्या खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी मिळाली, असे फुल्टन यांनी सांगितले.
आम्ही आता पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने नवीन दृष्टिकोन समोर ठेवून बेंगळूर येथे एकत्र येऊ. मी नेहमी सांगत आल्याप्रमाणे ही एक प्रक्रिया आहे. आम्ही आमच्या आशियाई क्रीडास्पर्धेतील मोहिमेचा आढावा घेऊ आणि एक संघ म्हणून अधिक चांगली कामगिरी कशा प्रकारे करू शकतो यावर विचार करून त्या दिशेने मार्गक्रमण करू, असे फुल्टन पुढे म्हणाले. राष्ट्रीय शिबिरासाठीच्या मुख्य गटात गेल्या महिन्यात आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघातील सर्व 18 खेळाडू आहेत.
संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने म्हटले आहे की, गेले काही आठवडे खूप चांगले गेले. कारण आम्हाला कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवायला मिळाला आणि चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेत आपापल्या राज्यासाठी खेळण्याचा आनंदही चांगला होता. आता आम्ही एक अधिक चांगला संघ बनण्याच्या आकांक्षेने शिबिरात परतलो आहोत, असे त्याने सांगितले.
या गटात निवडलेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत : गोलरक्षक-कृष्ण बहादूर पाठक, श्रीजेश परत्तू रवींद्रन, सूरज करकेरा, पवन, प्रशांतकुमार चौहान. बचावपटू-जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, वऊण कुमार, अमित रोहिदास, गुरिंदर सिंग, जुगराज सिंग, मनदीप मोर, नीलम संजीप झेस, संजय, यशदीप सिवाच, दीपसन तिर्की, मनजित.
मध्यफळीतील खेळाडू-मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, मोइरांगथेम रविचंद्र सिंग, समशेर सिंग, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल, सुमित, आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग, मोहम्मद राहिल मौसिन, मनिंदर सिंग. आघाडीपटू-एस. कार्थी, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजित सिंग, सिमरनजित सिंग, शिलानंद लाक्रा, पवन राजभर.









