केवळ एका जागेवरील उमेदवाराची प्रतीक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी पहिली यादी जाहीर केली आहे. 40 विधानसभा जागा असलेल्या या राज्यात काँग्रेसने 39 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने केवळ लुंगलेई दक्षिण जागेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मिझोरामच्या सर्व 40 विधानसभा जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ 17 डिसेंबरला संपणार आहे. या ईशान्येकडील राज्यात सध्या मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता आहे.
पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार ललसावता यांना ऐझल पश्चिम-3 विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. ऐझाँल पूर्व-1 मधून लालसांगरा रातले, ऐझाँल पश्चिम-1 मधून आर. लालबियाकथांगा आणि पलक येथून आयपी ज्युनियर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मिझोराममध्ये 2018 च्या निवडणुकीत ‘एमएनएफ’ने 40 सदस्यीय विधानसभेत 27 जागा जिंकल्या होत्या. तसेच काँग्रेसने चार, तर भाजपने एक जागा जिंकली. याशिवाय आठ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ‘एमएनएफ’ सरकार स्थापन झाले होते.









