किरण पाटील,आळते
Sangli News : गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं.शहरात,गावागावांत असो पाड्यापाड्यांत किंवा गल्लोगल्ली. जिथं-तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात.जिल्ह्यात घरोघरी दीड,अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच,सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना झाली.मात्र,’एक गाव एक गणपती’ सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते.तासगाव तालुक्यातील उत्तरेकडील डोंगराच्या कुशीत वसलेले ‘पाडळी’ हे गाव.या गावाने ‘एक गाव एक उत्सवाच्या’ माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने तब्बल ३८ वर्षांपासून अविरतपणे ही परंपरा सुरू ठेवली आहे.गावातून जमा होणार्या वर्गणीतून अनावश्यक खर्चाला फाटा देत समाज प्रबोधनावर व्याख्यान,मोदक स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची यासारख्या स्पर्धांमधून महिलांना स्पर्धेद्वारे गृहउपयोगी साहित्य बक्षीस देणारे एकमेव मंडळ आहे.
सन १९८६ मध्ये तत्कालीन सरपंच मुकुंद पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.आज अखेर येथे एकाच गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.विशेष म्हणजे गलई व्यवसायासाठी तासगाव तालुक्यात हे गाव अग्रेसर आहे.त्यामुळे प्रत्येक चौक,गल्लीबोळात,गणपती बसविण्यासाठी वेळ लागला नसता.मात्र,पूर्वीपासून अनेक विधायक उपक्रम राबवित गावकऱ्यांनी गावात आदर्श निर्माण केला आहे.त्याचाच एक भाग म्हणून ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिर परिसरात एकाच ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.विशेष म्हणजे मंडळाला अध्यक्ष नाही.त्यामुळे प्रत्येक राबणारा कार्यकर्ता हा अध्यक्ष असतो,असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.येथील सार्वजनिक गणेश व नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र झटतात.








