आवक बंद झाल्याने विसर्गही थांबला : पाण्याचा जपून वापर करावा
संकेश्वर : हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयात सोमवारी 38 टीएमसी पाणीसाठा होता. सध्या जलाशयात होणारी पाण्याची आवक बंद झाली असून जलाशयातून पाण्याचा विसर्गही बंद करण्यात आला आहे. 38 टीएमसी पाणीसाठा आगामी पावसाळी हंगामापर्यंत वापरात आणला जाणार आहे. परिणामी पाण्याचा साठा लक्षात घेता पाण्याचा जपून वापर करणे गरजेची बाब बनली आहे. या जलाशयावर बेळगाव जिल्ह्यासह विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील काहीसा भाग अवलंबून आहे. विशेष कऊन बेळगाव शहर व परिसर या जलाशयावरच विसंबून आहे. जिल्ह्यातील 52 टीएमसी पाणीसाठा असणारा एकमेव जलाशय असून मलप्रभा नदीवरील जलाशय त्यानंतर राकस्कोप व सर्वात लहान जलाशय म्हणून मार्कंडेयकडे पाहिले जाते. पाणी पुरवठ्याचा अधिक ताण राजा लखमगौडा जलाशयावरच आहे.
बेळगाव, संकेश्वर, हुक्केरीसह सुमारे 25 खेड्यांना राजा लखमगौडा जलाशयातून दररोज 60 क्युसेक्स पिण्याचे पाणी पुरवठा केले जाते. तर इतर लाभार्थी भागांना डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. पाणी वाटपाच्या नियमानुसार या जलाशयाकडून वर्षभर नियोजनाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. यंदा हंगामात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे जलाशय 52 टीएमसी क्षमतेने भरला नाही. यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात 44.37 टीएमसी इतकाच पाणीसाठा जलाशयात तयार झाला होता. आजतागायत 4 टीएमसी पाणी शेती तसेच पिण्यासाठी पुरवठा करण्यात आला आहे.
आगामी नोव्हेंबर ते जुलै 2024 पर्यंत असे एकूण 9 महिन्याच्या कालावधीसाठी जलाशयात असणाऱ्या 40 टीएमसीपैकी 38 टीएमसी पाणीसाठा उपयोगात आणला जाणार आहे. मृत साठा 2 टीएमसी इतका नियमानुसार राखीव ठेवावा लागणार असल्याने पाणीबाणीच्या परिस्थीतीत या पाण्याचा विचार नंतरच्या काळात केला जाणार आहे. उपलब्ध पाणी गरजेनुसार व माफक पद्धतीने वापरात आणणे गरजेचे आहे. पाण्याची नासाडी होणार नाही, पाणी वाया जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतल्यास उपलब्ध पाणीसाठा पावसाळी हंगामापर्यंत सहज पुरवठा करणे शक्य होणार आहे. दरम्यान यंदा पावसाअभावी धरण न भरल्याने अनेक अडचणी लाभार्थी भागाला बसणार असल्याचे दिसून येत आहे.









