बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघांची मतमोजणी आरपीडी महाविद्यालयामध्ये होणार : प्रशासनाकडून जय्यत तयारी
बेळगाव : साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कर्नाटकातील 224 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत तातडीने जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत माहिती दिली. बेळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 18 मतदारसंघ आहेत. या निवडणुकीची सर्व ती तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यात एकूण 38 लाख 33 हजार 37 मतदार आहेत. त्यामध्ये संपूर्ण राज्यात युवा मतदारांची सर्वात अधिक बेळगाव जिल्ह्यात नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 79 हजार 495 युवा मतदार असून ते आता पहिल्यांदाच मतदान करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मतदानासाठी जिल्ह्यामध्ये एकूण 4 हजार 434 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. तर काही मतदान केंद्रे राखीव ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 19 लाख 36 हजार 887 पुरुष मतदार तर 18 लाख 96 हजार 150 महिला मतदार आहेत. एप्रिल 10 पर्यंत ज्यांना 18 वर्षे पूर्ण होणार आहेत, त्या मतदारांचीही मतदारयादीमध्ये नोंद करून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यास संधी दिली जाणार आहे. त्यांनी क्रमांक 6 अर्ज भरून देणे गरजेचे आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सध्या 1 हजार 2 जणांची निवड केली गेली आहे. ते सध्या सर्वत्र काम पाहत आहेत. निवडणुकीसाठी एकूण 24 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये एकूण 688 अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त याचबरोबर स्वतंत्र चित्रिकरण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा अधिक वय असलेले 1 लाख 19 हजार मतदार आहेत. त्यांना पोस्टल तसेच इलेक्ट्रोल मतदान करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून याबाबत संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागृती केली जात आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
40 लाख खर्च करण्यास मुभा
उमेदवाराला 40 लाखापर्यंत निवडणुकीला खर्च करता येणार आहे. खर्च केलेल्या रकमेचा हिशेब मात्र दररोज द्यावा लागणार आहे. उमेदवाराला त्यापेक्षा अधिक रक्कम खर्च करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
50 हजारांपेक्षा अधिक रक्कम स्वत:कडे ठेवता येणार नाही
कोणताही व्यवहार करताना किंवा कोठेही जाताना 50 हजारपर्यंतच रक्कम आपणाला ठेवता येईल. त्यापेक्षा कोणाकडेही अधिक रक्कम आढळल्यास ती जप्त केली जाईल. जप्त केल्यानंतर त्या रकमेचा हिशेब दिला तरच ती रक्कम संबंधिताला परत केली जाईल. बँकेतून निवडणूक काळात 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम कोणालाही काढता येणार नाही. त्यापेक्षा अधिक रक्कम काढल्यास संबंधिताला नोटीस दिली जाणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
शहर व तालुक्यातील 9 जण तडीपार
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी शहर व तालुक्यातील एकूण 9 जणांना तडीपार करण्यात आल्याची माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी खबरदारी घेतली असल्याचे सांगितले.
चेकपोस्टच्या माध्यमातून तपासणी
सध्या एकूण 24 चेकपोस्ट कार्यरत आहेत. कोणत्याही परिस्थितीत मद्य, बेकायदेशीर रक्कम, वस्तूंची वाहतूक होत असेल तर त्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. चेकपोस्टबरोबरच भरारी पथकही तैनात करण्यात आले असून त्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन निवडणूक अधिकारी कार्यरत
जिल्ह्यामध्ये सध्या दोन निवडणूक अधिकारी कार्यरत आहेत. आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी ते नजर ठेवून आहेत. यासाठी अमित शिंदे आणि चंद्रकांत रे•ाr या दोन अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
1 लाख 61 हजार 194 मतदारांची वाढ
मागीलवेळी 12 मे 2018 रोजी मतदान झाले होते. त्यावेळी एकूण 36 लाख 71 हजार 843 मतदार होते. त्यामध्ये 1 लाख 61 हजार 194 मतदारांची वाढ झाली आहे. उमेदवाराला 28 लाख खर्च करण्याची मर्यादा देण्यात आली होती. त्यामध्ये यावेळी 12 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 4 हजार 414 मतदान केंद्रे होती. यावेळी 30 मतदान केंद्रांची वाढ झाली असून एकूण 4 हजार 434 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
आरपीडी महाविद्यालयात होणार मतमोजणी
जिल्ह्यातील 18 मतदारसंघांची मतमोजणी एकाच दिवशी असून आरपीडी महाविद्यालयामध्ये मतमोजणी होणार आहे. याबाबत सर्व ती तयारी केली जाणार असून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान आणि मतमोजणी अत्यंत काटेकोरपणे पार पडणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 27 जण तडीपार
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी, निवडणुकीच्या खबरदारीबाबत सर्व ती काळजी घेतली जाणार आहे. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आतापासूनच अंमलबजावणी केली जात आहे. जिल्ह्यातील एकूण 27 जणांना तडीपार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
18 मतदारसंघातील मतदार आणि मतदान केंद्रे
- मतदारसंघ मतदान केंद्रे पुरुष मतदार महिला मतदार एकूण
- निपाणी 246 111253 108732 219985
- चिकोडी-सदलगा 244 108686 107025 215711
- अथणी 260 114201 108887 223088
- कागवाड 231 97707 93343 191050
- कुडची 217 96220 91151 187371
- रायबाग 228 104483 98696 203179
- हुक्केरी 224 99492 99607 199099
- अरभावी 281 120380 119293 239673
- गोकाक 288 122245 125392 247637
- य् ामकनमर्डी 235 96749 97122 193871
- बेळगाव उत्तर 249 120923 122919 243842
- बेळगाव दक्षिण 251 121380 119327 240707
- बेळगाव ग्रामीण 292 124480 120719 245199
- खानापूर 255 108040 101131 209171
- कित्तूर 230 96126 93884 190010
- बैलहोंगल 224 95381 94596 189977
- सौंदत्ती 232 98164 97075 195239
- रामदुर्ग 247 100977 97251 198228
- एकूण 4434 1936887 1896150 3833037









