वृत्तसंस्था/ गाझा सिटी
गाझामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात किमान 38 जणांचा मृत्यू झाला. युद्धबंदीसाठी इस्रायलवर वाढत्या आंतरराष्ट्रीय दबाव असूनही, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हल्ले सुरू ठेवण्यावर ठाम आहेत. शनिवारी पहाटे मध्य आणि उत्तर गाझामध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक लोकांचा बळी गेला. मृतांमध्ये नुसेरात निर्वासित छावणीतील एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह अल-अवदा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी गाझा शहरातील तुफाह भागातील एका घरावर झालेल्या हल्ल्यात किमान 11 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये बहुतांश महिला आणि मुले होती. निर्वासित छावणीवर झालेल्या आणखी एका हवाई हल्ल्यात आणखी 4 जणांचा मृत्यू झाला.
गाझा शहरातील रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रे कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहेत. सुमारे दोन आठवड्यांच्या हल्ल्यांमध्ये दोन दवाखाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. गाझा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये 65,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1,67,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांपैकी जवळजवळ निम्मे महिला आणि मुले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.









