दीड महिन्यांपासून मंगळुरात वास्तव्य : कॅनडाला जाण्याचा होता बेत
प्रतिनिधी / बेंगळूर
घुसखोरी करून देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱया 38 श्रीलंकन नागरिकांना अटक करण्यात मंगळूर शहर दक्षिण विभागाचे पोलीस यशस्वी ठरले आहेत. समुद्रीमार्गाने तामिळनाडू आणि तेथून मंगळूरमध्ये आलेले हे घुसखोर मागील दीड महिन्यापासून येथे बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याचे कारवाईवेळी उघडकीस आले.
सर्व घुसखोर 17 मार्च रोजी श्रीलंकेतील एजंटांना 6 ते 10 लाख रुपये देऊन तामिळनाडूच्या तुतुकुडी येथे पोहोचले होते. नंतर त्यांना खासगी मालवाहू जहाजातून कॅनडाला पाठविण्याची योजना होती. मात्र, तामिळनाडून निवडणुकांची घोषणा झाल्याने या टोळीसमोर अडचणी आल्याने त्यांनी मंगळुरात आश्रय घेतला होता.
लॉकडाऊनमुळे हे श्रीलंकन घुसखोर मंगळूरमध्येच अडकून पडले होते. ते समुदीमार्गाने कॅनडाला जाण्याच्या तयारीत होते, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीवेळी उघडकीस आली आहे. या घुसखोरांना वास्तव्यासाठी मंगळूरमधील 6 ते 7 स्थानिक रहिवाशांनी मदत केल्याचेही सामोरे आले आहे. ते सर्वजण दोन लॉज आणि दोन घरांमध्ये वास्तव्यास होते. ते स्वतःला स्थानिक मच्छीमार असल्याचे सांगत होते. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मंगळूर शहर पोलीस आयुक्त शशिकुमार यांनी दिली आहे.
एक जण माघारी
अटकेतील घुसखोरांजवळ पासपोर्ट, व्हिसा यासह कोणतेही ठोस कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. सुरूवातीला तामिळनाडूमार्गे भारतात प्रवेश केलेल्या 39 श्रीलंकन नागरिकांनी नंतर कर्नाटकात मंगळूरमध्ये प्रवेश केला. त्यापैकी एकजण श्रीलंकेला परत गेला होता. त्याचा शोध घेऊन अटक करण्यात येईल, अशी माहितीही शशीकुमार यांनी दिली.









