11 जणांना आजन्म कारावास : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी ऐतिहासिक निकाल : 13 वर्षांनंतर न्याय
अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरातमधील अहमदाबाद येथे 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने 38 दोषींना फाशीची, तर 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. या बॉम्बहल्ल्यामध्ये 56 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने सुनावलेला हा निर्णय आतापर्यंतचा ऐतिहासिक निकाल आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 49 दोषींच्या शिक्षेवर सुनावणी पार पडली. तसेच, एकाचवेळी 38 जणांना फाशी सुनावण्याची देशाच्या न्यायालयीन इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
बॉम्बस्फोटाचे हे प्रकरण गेल्या 13 वर्षांपासून न्यायालयात होते. 8 फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. आर. पटेल यांनी 49 आरोपी दोषी असल्याचा निकाल दिला होता. तर 77 पैकी 28 आरोपींना सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त केले होते. दोषी ठरवण्यात आलेल्या 49 जणांना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली. बचावपक्षाच्या वकिलांनी कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी धुडकावून लावत न्यायालयाने 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावण्यासह मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 25 हजार रुपये भरपाई देण्याचेही आदेश दिले.
अहमदाबाद येथे 26 जुलै 2008 रोजी एकामागोमाग एक 21 साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 56 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेनंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही गुजरातला भेट दिली होती. तत्कालीन डीजीपी आशिष भाटिया यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने 19 दिवसांमध्ये 30 दहशतवाद्यांना अटक केली होती आणि यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना अटक झाली होती. स्फोटांप्रकरणी तपास अनेक वर्षांपर्यंत चालला आणि सुमारे 80 आरोपींवर खटला चालला.
इंडियन मुजाहिद्दीनने घडवले बॉम्बस्फोट
इंडियन मुजाहिदीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाच्या दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवून आणले होते. 2002 मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या संघटनेनेच जयपूर आणि वाराणसीमध्ये बॉम्बस्फोट घडवले होते. खटल्याशी निगडित 6000 दस्तऐवज न्यायालयासमोर मांडले गेले होते. 77 आरोपींप्रकरणी 13 वर्षांनी युक्तिवाद पूर्ण झाला. यादरम्यान 7 न्यायाधीश बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विविध कारागृहांमध्ये आरोपी कैद
दिल्लीच्या तुरुंगात कैद यासीन भटकळवर नव्याने खटला चालविला जाणार आहे. यासीन पाकिस्तानात पळाला होता. त्याला नेपाळमधून ताब्यात घेण्यात आले होते. 77 आरोपींपैकी अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात 49, भोपाळ तुरुंगात 10, मुंबईच्या तळोजा तुरुंगात 4, बेंगळूर तुरुंगात 5, केरळमधील तुरुंगात 6, जयपूर तुरुंगात 2 आणि दिल्ली तुरुंगातही आरोपी कैद आहेत.
ऐतिहासिक निकाल
अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयानुसार एकाचवेळी 38 जणांना फाशी ठोठावण्याची देशाच्या न्यायालयीन इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. तसेच, उर्वरित 11 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. खटल्यात एकूण 78 आरोपी होते. एक आरोपी नंतर माफीचा साक्षीदार झाल्यामुळे एकूण 77 आरोपी होते. तब्बल 13 वर्षे चाललेल्या खटल्यात 1,163 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. पोलीस आणि कायदेशीर यंत्रणांनी 6 हजारांहून अधिक पुरावे सादर केले होते.
49 दोषी, 28 निर्दोष
अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी 6,752 पानांच्या निकालात 49 आरोपींना दोषी ठरवले होते. तर पुराव्याअभावी 28 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. दोषींना आयपीसी कलम 302 (हत्या) आणि ‘युएपीए’ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या हायप्रोफाईल खटल्याची प्रारंभिक सुनावणी साबरमती तुरुंगात झाली. तसेच अखेरच्या टप्प्यात बहुतांश सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली होती.
70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट
26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये सायंकाळी 6.45 वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर 70 मिनिटांमध्ये आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. दहशतवाद्यांनी टिफिनमध्ये बॉम्ब टाकून तो सायकलवर ठेवला होता. हे स्फोट गर्दीच्या ठिकाणी आणि बाजारपेठेत झाले. स्फोटांच्या 5 मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी प्रसारमाध्यमांना एक मेलही पाठवला होता.
खटल्याविषयी ठळक नोंदी…
@ 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटांत 21 स्फोट
@ बॉम्बस्फोटात 56 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जण जखमी
@ अहमदाबादमध्ये 20, सुरतमध्ये 15 एफआयआर नोंदवण्यात आले
@ डिसेंबर 2009 पासून सुनावणी सुरू, सर्व 35 एफआयआर एकत्रित
@ 1,163 साक्षीदारांचे जबाब नोंद, 6 हजारांहून अधिक पुरावे सादर
@ एकूण 78 आरोपी, एक सरकारी साक्षीदार बनल्यानंतर 77 बाकी
@ 8 फेब्रुवारी 2022 रोजी 49 आरोपींना न्यायालयाने ठरवले दोषी
@ न्यायमूर्ती अंबालाल पटेल यांच्याकडून 6,752 पानांचा निकाल
@ 49 आरोपींपैकी 38 जणांना फाशी, 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा









