ख्वाजाचे अर्धशतक, ब्रॉडचे 4 बळी, टंग – रॉबिनसन प्रत्येकी दोन बळी
वृत्तसंस्था/ लंडन
पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील येथील लॉर्डस् मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने चहापानावेळी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 279 धावांवर समाप्त झाल्याने इंग्लंडला आता विजयासाठी 371 धावांचे आव्हान मिळाले आहे.
या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून इंग्लंडवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच मिळवली आहे. या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 416 धावा जमवल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 325 धावात आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 91 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने 2 बाद 130 या धावसंख्येवरून शनिवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि उपाहारापर्यंत त्यांनी 74 षटकात 5 बाद 222 धावापर्यंत मजल मारली होती.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सलामीच्या उस्मान ख्वाजाने 187 चेंडूत 12 चौकारासह 77, वॉर्नरने 76 चेंडूत 2 चौकारासह 25, लाबुशेनने 51 चेंडूत 5 चौकारासह 30, स्टिव्ह स्मिथने 62 चेंडूत 5 चौकारासह 34, हेडने 1 चौकारासह 7 धावा जमवल्या. वॉर्नर आणि ख्वाजा यांनी पहिल्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. वॉर्नर बाद झाल्यानंतर ख्वाजा आणि लाबुशेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 60 धावांची भर घातली. ख्वाजा आणि स्मिथ या जोडीने चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या ब्रॉडने ख्वाजाला बदली खेळाडूकरवी झेलबाद केले. त्यानंतर इंग्लंडच्या टंगने स्मिथला क्रॉलेकडे झेल देण्यास भाग पाडले. ब्रॉडच्या अचूक गोलंदाजीसमोर हेड झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 5 बाद 197 अशी होती. ग्रीन 15 तर कॅरे 10 धावावर खेळत होते. शनिवारी खेळाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने आणखी तीन गडी गमवताना 92 धावा जमवल्या.
खेळाच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे उर्वरीत 5 गडी 82 धावांत तंबूत परतले. हेडने 7, ग्रीनने 18, कॅरेने 21, कमिन्सने 11 तर स्टार्कने नाबाद 15 धावा जमविल्या. चहापानावेळीच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 101.5 षटकात 279 धावांवर समाप्त झाला. इंग्लंडतर्फे ब्रॉडने 4 तर टंग व रॉबिनसन यांनी प्रत्येकी 2 तसेच अँडरसन व स्टोक्स् यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 100.4 षटकात सर्वबाद 416, इंग्लंड प. डाव 76.2 षटकात सर्व बाद 325, ऑस्ट्रेलिया दु. डाव 101.5 षटकात सर्वबाद 279 (उस्मान ख्वाजा 77, वॉर्नर 25, लाबुशेन 30, स्मिथ 34, हेड 7, ग्रीन 18, कॅरे 21, स्टार्क नाबाद 15, कमिन्स 11, अवांतर 36, अँडरसन 1-64, ब्रॉड 4-53, टंग 2-53, रॉबिनसन 2-48, स्टोक्स् 1-26).
धावफलक चहापानापर्यंत