केंद्रीय गृहमंत्र्यांचे जम्मूतील सभेत विधान – आता कुणालाच घाबरण्याची गरज नाही
वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू-काश्मीरच्या दौऱयाच्या दुसऱया दिवशी गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मूमधील सभेला संबोधित केले आहे. कलम 370 हद्दपार झाल्यावर या भागात विकासाचा नवा प्रवास सुरू झाला आहे. आता येथे कुणालाच घाबरण्याची गरज नाही. जम्मूच्या लोकांसोबत आता भेदभाव होणार नसल्याचे उद्गार त्यांनी रविवारी काढले आहेत.
काही लोक सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. एकाही व्यक्तीचा जीव जाऊ नये अशी स्थिती निर्माण करण्याची आमची इच्छा आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी निर्मितीकार्ये सुरू झाली आहेत. जम्मूमध्ये दोन वर्षांच्या आत मेट्रोसेवा सुरू होईल. शनिवारी हेलिकॉप्टर धोरणाची घोषणा झाली. आता जम्मूच्या प्रत्येक जिल्हय़ात हेलिपॅड निर्माण केले जाणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
12 हजार कोटींची गुंतवणूक
शाह यांनी मोदी सरकारच्या योजनांचा उल्लेख करताना जम्मू-काश्मीरच्या 7 हजार लोकांना नोकरीचे नियुक्ती पत्र देण्याची घोषणा केली आहे. तर केंद्रशासित प्रदेशात 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याची माहिती दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर उज्ज्वला योजनेसमवेत मोदी सरकारच्या विकासाच्या योजनेचा उल्लेख केला आहे.
55 हजार कोटींचे पॅकेज
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होताच 55 हजार कोटींचे पॅकेज जम्मू-काश्मीरला दिले. मोदींच्या शासनकाळात कुणासोबतच अन्याय होणार नाही. 3 परिवारवाले काय देणार अशी विचारणा मला करत होते. या परिवारांना आतापर्यंत कुणाची चिंता राहिली होती? त्यांनी 70 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरला काय दिले असे प्रश्नार्थक विधान करत शाह यांनी अब्दुल्ला, मुफ्ती आणि गांधी परिवाराला लक्ष्य केले आहे.
आयआयटीचा सॅटेलाइट कॅम्पस
जम्मू-काश्मीरमध्ये 7 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना झाली आहे. तसेच आज (रविवारी) आयआयटीच्या एका कॅम्पसचे उद्घाटन झाले आहे. आजवर मी इतका आधुनिक कॅम्पस पाहिलेला नाही. सॅटेलाइट कॅम्पस सुरू करून अधिकाधिक जम्मू-काश्मीरच्या मुलांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
तरुणाईसमोर दहशतवादी फेल
जम्मू-काश्मीरचे 45 हजार युवा लोकांच्या सेवेत रुजू झाल्यास दहशतवादी काहीच वाकडं करू शकत नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीमुळे 5 लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत. आम्ही नवे औद्योगिक धोरण सादर केले असता त्याची थट्टा उडविण्यात आली. पण 12 हजार कोटींची गुंतवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वेगवान लसीकरण
कोरोना संकटाने पूर्ण जगाला हादरवून सोडले होते. भारत याला कशाप्रकारे तोंड देणार असा विचार लोक करत होते, पण मोदींनी कोरोना महामारीचे संकट योग्यप्रकारे हाताळले. जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस 100 टक्के लोकांना मिळाला आहे. ही कामगिरी साध्य करणारे जम्मू-काश्मीर देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले असल्याचे शाह म्हणाले.









