केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद 370 रद्द केल्यापासून आतापर्यंत 439 दहशतवादी मारले गेले आहेत, तर या केंद्रशासित प्रदेशात दहशतवादाशी संबंधित 541 घटनांची नोंद झाली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. राज्यसभा खासदार नीरज डांगी यांनी विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून मंत्रीमहोदयांनी लेखी उत्तर दिले आहे.
जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 रद्द केल्यापासून म्हणजेच 5 ऑगस्ट 2019 ते 26 जानेवारी 2022 पर्यंत 541 दहशतवादी घटना घडल्या आहेत, तर 439 दहशतवादी मारले गेले आहेत आणि 98 नागरिक मारले गेले आहेत. याचदरम्यान 109 जवान हुतात्मा झाले आहेत. या घटनांदरम्यान कोणतेही महत्त्वपूर्ण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, अशी माहितीही गृह राज्यमंत्र्यांनी वरि÷ सभागृहाला दिली. तथापि, वैयक्तिक मालमत्तेचे सुमारे 5.3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांबाबत राज्यसभेत विचारणा करण्यात आली. यासोबतच या काळात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत किती सुरक्षा जवान हुतात्मा झाले आहेत, अशीही विचारणा करण्यात आली होती. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरू झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी आणि दुसरे सत्र 14 मार्च ते 8 एप्रिलदरम्यान चालणार आहे.
जानेवारीमध्ये 21 दहशतवाद्यांना कंठस्नान
जानेवारीमध्येच, सुरक्षा दलांनी आतापर्यंत 11 चकमकीत 21 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, ज्यात आठ पाकिस्तानी आहेत. तीन दिवसांपूर्वीच एका दिवसात दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ‘जैश’च्या कमांडरसह पाच जणांना कंठस्नान घालण्यात आले होते. अलीकडील नागरी हत्येनंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱयात दहशतवाद्यांविरोधात कारवाया तीव्र केल्या आहेत.









