अमेरिकेच्या वॉशिंग्टनच्या किनाऱयापासून काही अंतरावर जुआन डे फूकाच्या क्षेत्रात एक छोटे बेट आहे. 370 एकरच्या या बेटाची लांबी 2 मैल आहे. येथे केवळ एकच व्यक्ती राहतो. मार्टी ब्ल्यूवॉटर (72 वर्षे) असे त्यांचे नाव आहे. या बेटावर ब्ल्यूवॉटर एकमात्र भाडेकरू आहेत आणि ते देखील आजीवन. मालमत्ता विक्रीत झालेल्या फसवणुकीनंतर या बेटावर राहण्यास त्यांनी सुरुवात केली होती. पण आता ते पर्यावरण संरक्षणासाठी काम करत आहेत.
70 च्या दशकात प्रॉपर्टी डेव्हलपर्सने या बेटवर प्लॉटिंग करून समुद्रादरम्यान एक सुंदर भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. 1971 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी ब्ल्यूवॉटर येथे भूखंड पाहण्यास आले असता त्यांना येथील सौंदर्याची भुरळ पडली आणि त्यांनी 7 हजार डॉलर्समध्ये एक भूखंड खरेदी केला आणि याचबरोबर तेथे वाद उभा ठाकला.

पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱया संघटनांनी बेटावर मानवी वस्ती वसविण्याच विरोध दर्शविला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. 1982 मध्ये न्यायालयाने या बेटाला वन्यजीवांसाठी संरक्षित केले. ज्या लोकांनी तेथे घर उभारले होते, त्यांना 15 वर्षे, 25 वर्षे किंवा आजीवन तेथे राहण्याचा पर्याय देण्यात आला. आजीवन राहण्याचा पर्याय निवडणारे ब्ल्यूवॉटर एकमात्र व्यक्ती ठरले.
पर्यावरणासाठी कार्य
बेटावर वीज नाही, ब्ल्यूवॉटर यांच्याकडे लाकडाने पेटणारा स्टोव्ह आहे. स्वयंपाकासाठी चूल आणि पाणी गरम करण्यासाठी एक हिटर आहे. एकांत मला त्रास देत नसल्याचे सांगणारे ब्ल्यूवॉटर आता पर्यावरण संरक्षणासाठी काम करतात.









