अमेरिकेकडून गेल्या पंधरवड्यात कारवाई : मृतांमध्ये कमांडरचाही समावेश
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
सीरियातील आयएसआयएस आणि अल कायदाशी संबंधित दहशतवादी गटांच्या ठिकाणांवर अमेरिकेने पुन्हा एकदा जोरदार हल्ले चढवले. या संघर्षात 37 दहशतवादी ठार झाल्याचे अमेरिकन सैन्याने जाहीर केले आहे. अमेरिकेने दोन वेगवेगळ्या दिवशी सीरियामध्ये मोहीम राबविली. 16 सप्टेंबर रोजी मध्य सीरियामध्ये ‘आयएस’च्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये 28 दहशतवादी मारले गेले. यानंतर 24 सप्टेंबर रोजी अमेरिकन लष्कराने उत्तर-पश्चिम सीरियात केलेल्या हल्ल्यात अल कायदा गटाचे 9 दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यात अल कायदा संघटनेशी संबंधित हुर्रस अल-दिनचा टॉप कमांडर अब्द-अल-रौफ याचा खात्मा केल्याची माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे.









