मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे विदेशमंत्र्यांना पत्र
वृत्तसंस्था/ चेन्नई
श्रीलंकेच्या जलक्षेत्रात दाखल झालेल्या तामिळनाडूच्या 37 मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली तसेच त्यांच्या मासेमारीच्या 5 नौका जप्त केल्या आहेत. मत्स्यपालन विभागाच्या एका अधिकाऱ्याने रविवारी यासंबंधी माहिती दिली आहे.
या मच्छिमारांना शनिवारी रात्री श्रीलंकेच्या नौदलाने एका मोहिमेदरम्यान पकडले होते. चालू महिन्यात श्रीलंकेच्या नौदलाने मासेमारी करणाऱ्या 10 नौका जप्त करत 64 मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी हा मुद्दा केंद्र सरकारसमोर उपस्थित केला तसेच विदेशमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून सर्व मच्छिमार आणि त्यांच्या नौकांची मुक्तता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती केली आहे.
आमचे मच्छिमार उपजीविकेसाठी पूर्णपणे मासेमारी अवलंबून आहेत. सातत्याने होणाऱ्या अटकेच्या कारवाईमुळे मच्छिमार समुदायाला मोठा त्रास होतोय. श्रीलंकेच्या नौदलाच्या अशाप्रकारच्या कृत्यांमुळे राज्याच्या मच्छिमार समुदायांवर दबाव निर्माण झाला असून ते दहशतीत जगत आहेत. तामिळनाडूच्या मच्छिमारांना त्यांच्या प्रश्नांकडे कुणीच लक्ष देत नसल्याचे वाटत आहे. भारत सरकारने आमच्या मच्छिमारांच्या अधिकारांसाठी अधिक आग्रही भूमिका घेत त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आणावा असे स्टॅलिन यांनी विदेशमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
खाडी क्षेत्रात भारतीय मच्छिमारांच्या मासेमारीच्या पारंपरिक अधिकारांचे रक्षण करण्यात यावे. अटक आणि नौका जप्त करण्याची कारवाई रोखण्याची मागणी सातत्याने केली जात असूनही श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छिमारांना अटक करण्याचे सत्र सुरूच ठेवल्याचे स्टॅलिन यांनी नमूद केले आहे.









