लोणावळा : भांगरवाडी भागात राहणाऱ्या 37 जणांना केदारनाथ व चारधाम यात्रेचे आमिष दाखवत त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 36 हजार रुपये स्विकारत नंतर संबंधित यात्रा रद्द झाली असल्याचे कारण सांगून बनावट चेक देत गंडा घालणाऱ्या पुण्यातील एका टूर चालकावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीपकुमार दत्तात्रय मोदे (वय 55, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड रोड वडगाव बुद्रुक येथील ड्रिम कास्टर टूरचे संकेत रामचंद्र भडाळे (रा. पोकळवस्ती धायरेश्वे मंदीराचे मागे धायरी पुणे) याच्या विरोधात हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकार हा 16/02/2023 ते 19/05/2023 दरम्यान भांगरवाडी लोणावळा येथे घडला आहे.
संकेत रामचंद्र भडाळे याने त्याचे ड्रिमकास्टर टुर्सचे ऑफिस वडगाव बुद्रुक पुणे येथे असल्याचे सांगत लोणावळय़ातील 37 नागरिकांची केदारनाथ चारधाम यात्रा टुर्सच्या माध्यमातून आयोजित केली होती. याकरिता प्रत्येकी 28 हजार रुपये असे एकूण 10,36,000 रूपये चेकच्या माध्यमातून घेतले. रितसर करारनामा केला व यात्रा कशी असेल, कोणती वाहने असतील याचा तपशील त्यांना दिला. त्यानंतर ऐनवेळी 10 मे रोजी रात्री उशिरा यात्रा रद्द झाली असल्याचे सांगत जून महिन्यात यात्रा आयोजित करुन देतो असे सांगितले. किंवा घेतलेले पैसे परत करतो असे सांगत 18 मे च्या तारखेचे चार चेक दिले. 18 मे रोजी सदरचे चेक बँकेत भरले असता ते खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाले. तेव्हापासून त्याचा फोन देखील बंद आहे. त्याच्या भावाला संपर्क केला असता त्याने मी उत्तराखंडला असल्याचे सांगत आल्यावर बघू असे सांगितले.
त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. फसवणूक झालेले सर्व नागरिक शहरातील मध्यमवर्गीय असून त्यांनी चारधाम यात्रेसाठी पैशांची जुळवाजुळव करत पैसे भरले होते. नागरिकांच्या भोळेपणाचा फायदा घेत त्यांना लुटण्याचा सपाटा सध्या संधीसाधू लोकांनी चालविला आहे. नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यकता असून पूर्ण खात्री झाल्याशिवाय कोणाशीही आर्थिक व्यावहार करु नये, असे आवाहन लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी केले आहे.








