सर्व वसती योजना कुचकामी : 53 हजार 409 घरांचे काम पूर्ण, तर निवड प्रक्रियेच्या घोळामुळे अनेक घरे अर्धवट
प्रतिनिधी / बेळगाव
प्रत्येक गरीबाला वाटते की आपल्या स्वप्नातील एक घर असावे. हाच दृष्टिकोन ठेवून केंद्र व राज्य सरकारने विविध योजनांतर्गत घरांना मंजुरी दिली. मात्र अजूनही या घरांची कामे अर्धवट आहेत. मात्र या योजनेत लाभार्थी निवड प्रक्रियेत होणाऱया गैरप्रकारांमुळे योजनांची अंमलबजावणी करण्यास विलंब होते तर तब्बल हजारो घरांचे काम अर्धवट आहे. सरकारकडून वेळेवर उपलब्ध करून देण्यात येत नसलेला निधी, राजकीय हेवेदावे यामुळे जिल्हय़ात 37 हजारांहून अधिक घरांची कामे मागील दहा वर्षांपासून अर्धवट पडली आहेत.
जिल्हय़ात 37 हजार 155 घरांचे काम अजूनही सुरूच झाले नाही. तर फौंडेशनपर्यंत 11 हजार 301 पूर्ण तर त्यामध्येही 588 घरे अर्धवट आहेत. लिंटल लेव्हल 8 हजार 922 तर 200 घरे अर्धवट याचबरोबर रुफ पूर्ण केलेली घरे 12 हजार 825 तर 181 घरांची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे मागील दहा वर्षांत वसती योजनांची कामे रेंगाळल्याचे दिसून येत आहे. मागील दहा वर्षांपासून 54 हजार 409 घरांची कामे पूर्ण झाली आहेत.
बेळगाव जिल्हय़ात मागील 7 ते 8 वर्षांपासून कोणत्याही योजनेतून घरे मंजूर झाली नाहीत. ही गोष्ट खरी असली तरी मागील दहा वर्षांपासून अजूनही वसती योजनेतील घरांची कामे अर्धवट आहेत तर हजारो घरांची कामे अजून सुरूच झाली नाहीत. त्यामुळे अजूनही याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याकडे कानाडोळा याचबरोबर राजकीय पक्षांचे हेवेदावे आणि यामध्ये भरडणारे नागरिक याचा परिणाम या वसती योजनांवर झाला आहे. कोरोना काळात बेळगाव जिल्हय़ातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 20 घरे मंजूर करण्यात आली होती. मात्र मागील योजनांमधील हजारो घरे अर्धवट स्थितीत आहेत. तर काहींनी फौंडेशन, काही घरांचे प्लिंथ अशी सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत. मागील दोन वर्षांपासून तर कोरोनामुळे घरांच्या कामांमध्ये प्रगती नाही. त्यामुळे नूतन मंजूर झालेली घरेही सरकारने रद्द केल्याची माहिती उपलब्ध झाली आहेत. ग्रामपंचायत स्तरावर चालणारे राजकीय हेवेदावे तसेच आपल्याच मर्जीतल्या लोकांना योजनेतून घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी चाललेली ग्रामपंचायत सदस्यांची चढाओढ यामुळे योग्य लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. बऱयाच गावात अपात्र लाभार्थींची निवड झाली असून आणि जीपीएसमध्ये चुकीची माहिती दिल्यामुळे अशा लाभार्थींना मंजूर झालेली घरे रद्द करण्यात आली होती. अजूनही अशीच परिस्थिती आहे. बसव वसती योजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना, अटल बिहारी वाजपेयी वसती योजना, इंदिरा आवास योजना यासह इतर योजनांतील अनेक घरे अर्धवट राहिली आहेत.









