हमासने केली तीन इस्रायली ओलिसांची मुक्तता
वृत्तसंस्था/ तेल अवीव
हमासच्या कैदेतून इस्रायली बंधकांच्या सुटकेनंतर इस्रायलने शनिवारी 369 पॅलेस्टिनी कैद्यांनाही सोडले. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, या कैद्यांना विशिष्ट प्रकारचे टी-शर्ट घालायला लावल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. या टी-शर्टवर ‘आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नाही’ अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता. हमास इस्रायली ओलिसांच्या सुटकेपूर्वी दरवेळी त्यांचे सादरीकरण केले जाते. तसेच ओलिसांना हमासची स्तुती करायला लावले जाते.
हमासने 3 इस्रायली ओलिसांची सुटका केली आहे. गेल्या महिन्यात लागू झालेल्या युद्धबंदी करारांतर्गत ओलीस आणि पॅलेस्टिनी कैद्यांची ही सहावी अदलाबदल होती. युद्धबंदी करारांतर्गत या तीन ओलिसांना गाझाच्या खान युनूस भागात सकाळी 10 वाजता (इस्रायली वेळेनुसार) रेड क्रॉसकडे सोपवण्यात आले. यानंतर त्यांना इस्रायली सैन्याच्या स्वाधीन करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या तीन पुरुष ओलिसांची नावे सागुई डेकेल-चेन, साशा ट्रोफानोव्ह आणि आयअर हॉर्न अशी आहेत. यावेळी सोडण्यात आलेले तीन इस्रायली बंधक गेल्या आठवड्यात सोडण्यात आलेल्या बंधकांपेक्षा निरोगी असल्याचे दिसून आले.
मागच्या वेळी सोडण्यात आलेले तीन ओलीस अत्यंत बारीक झाले होते. हमासने आतापर्यंत 19 इस्रायली आणि 5 थाई बंधकांना सोडले आहे.









