17 वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीची सांगता, आरसीबीलाही अलविदा, विविध स्तरावरुन स्तुतिसुमनांची उधळण
जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था
17 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 360 डिग्री फलंदाजी करणाऱया आधुनिक क्रिकेटमधील महान फलंदाज एबी डीव्हिलियर्सने शुक्रवारी सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. 37 वर्षीय डीव्हिलियर्सने यावेळी आयपीएल प्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला देखील अलविदा केला. ट्वीटरवर त्याने आपल्या देदीप्यमान कारकिर्दीची सांगता केली.

दक्षिण आफ्रिकेतर्फे 114 कसोटी, 228 वनडे व 78 टी-20 सामने खेळणाऱया या दिग्गज फलंदाजाची अवघ्या क्रिकेट वर्तुळावर नेहमीच मोहिनी राहिली. आयपीएल प्रँचायझी आरसीबीकडून खेळताना त्याने भारतीयांचे प्रेम प्रकर्षाने अनुभवले. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना त्याने या सर्व घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
‘माझ्या कारकिर्दीसाठी माझ्या कुटुंबियांनी, माझ्या पालकांनी, पत्नी डॅनिएले व मुलांनी बरेच त्याग केले. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर माझे या सर्वांना आता प्रथम प्राधान्य असेल’, असे एबी डीव्हिलियर्स याप्रसंगी म्हणाला. दक्षिण आफ्रिकेचा हा माजी कर्णधार व फलंदाजीतील मुख्य आधारस्तंभ यापूर्वी 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.
निर्व्याज प्रेमाबद्दल आभार
‘अगदी बॅकयार्डमध्ये भावांसह खेळण्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करताना खेळाचा आनंद लुटता आला. पण, आता वयाच्या 37 व्या वर्षी तितकी उर्जा राहिलेली नाही. या सर्व वाटचालीत साथ देत आलेल्या प्रत्येक संघसहकारी, प्रत्येक प्रतिस्पर्धी, सर्व प्रशिक्षक, फीजिओ व प्रत्येक सदस्याचा मी मनापासून आभारी आहे. दक्षिण आफ्रिकेत, भारतात जिथे-जिथे खेळलो, तेथे मला भरभरुन प्रेम मिळाले’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
डीव्हिलियर्सने 114 कसोटी सामन्यात 50.66 च्या सरासरीने 8765 धावांचे योगदान दिले. शिवाय, 2 बळीही घेतले. नाबाद 278 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. या क्रिकेट प्रकारात त्याने 22 शतके झळकावली. 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा हा दिग्गज फलंदाज दक्षिण आफ्रिकेसाठी सातत्याने स्टार परफॉर्मर ठरला.
डीव्हिलियर्स वनडे व टी-20 या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 360 डिग्री प्लेयर राहिला. त्याने 228 वनडे सामन्यात 53.50 च्या लक्षवेधी सरासरीने 9577 धावा फटकावल्या. 176 ही त्याची वनडेतील सर्वोत्तम खेळी राहिली. त्याचा स्ट्राईक रेट 101.09 इतका राहिला. त्याच्या खात्यावर 25 वनडे शतके आहेत. त्याने 2005 मध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण नोंदवले. याशिवाय, 78 टी-20 सामन्यात 26.12 च्या सरासरीने त्याने 1672 धावांचे योगदान दिले. त्याने 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मधील आंतरराष्ट्रीय पदार्पण नोंदवले.
भावूक होत डीव्हिलियर्स म्हणाला, मी मनाने नेहमीच आरसीबियन!
आयपीएल प्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरतर्फे खेळणे हा आपला नेहमीच सन्मान होता, असे सांगत एबी डीव्हिलियर्सने आपण यापुढे आरसीबीकडून खेळणार नसलो तरी मनाने नेहमी आरसीबियनच राहणार असल्याचे सांगितले.
‘आरसीबीकडून मी तब्बल 10 हंगामात खेळलो. इतक्या प्रदीर्घ कालावधीचा प्रवास थांबवण्याचा निर्णय सोपा कधीच नव्हता. पण, यापुढे मला माझ्या कुटुंबियांना अधिक वेळ देण्यासाठी या निर्णयाप्रत येणे क्रमप्राप्त आहे. आरसीबी व्यवस्थापन, माझा मित्र विराट कोहली, संघसहकारी, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, चाहते व पूर्ण आरसीबी फॅमिलीने माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा होता. त्या बळावरच मी इतकी प्रदीर्घ वाटचाल करु शकलो’, असे या दिग्गज फलंदाजाने नमूद केले.
एबी डीव्हिलियर्सने आरसीबीतर्फे 156 सामने खेळत 4491 धावांची आतषबाजी केली. याशिवाय, दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचेही त्याने प्रतिनिधीत्व केले. आयपीएल इतिहासात त्याच्या खात्यावर 184 सामन्यात 5162 धावा नोंद आहेत.
आरसीबीच्या इतिहासात सर्वकालीन सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत देखील तो विराट कोहलीपाठोपाठ दुसऱया स्थानी विराजमान राहिला. आरसीबीतर्फे सर्वाधिक दुसऱया व तिसऱया क्रमांकाच्या धावा त्याच्या खात्यावरच आहेत. त्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद 133 तर 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद 129 धावांची धुवांधार खेळी साकारली होती.
कोटस्

आमच्या वेळचा सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे एबी डीव्हिलियर्स! आरसीबीसाठी त्याने दिलेल्या योगदानाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. खेळापलीकडेही डीव्हिलियर्सशी बांधिलकी होती आणि भविष्यातही राहील.
-भारताचा कसोटी, वनडे कर्णधार विराट कोहली
डीव्हिलियर्सने निवृत्ती स्वीकारली, याबद्दल मी त्याचे सर्व गोलंदाजांच्या वतीने जाहीर आभार मानतो. कारण, डीव्हिलियर्स गोलंदाजांसाठी नेहमी कर्दनकाळच होता. पण, एक प्रगल्भ खेळाडू या नात्याने त्याची मैदानावर यापुढे नेहमी प्रकर्षाने उणीव जाणवेल.
-अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान
आजवर मी जितक्या खेळाडूंसह खेळलो, त्या सर्वांमध्ये एबी डीव्हिलियर्स हा सर्वात महान राहिला. त्याच्यासमवेत खेळता आले, हा मी माझा सन्मान मानतो.
-दक्षिण आफ्रिकन माजी कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस

एबी डीव्हिलियर्सने क्रिकेटला दिलेले योगदान विशेष लक्षवेधी आहे. तो स्वतः उत्तम ऍथलिटही होता. भविष्यातील वाटचालीबद्दल त्याला शुभेच्छा.
-भारतीय आघाडीवीर शिखर धवन
अव्वल दर्जाच्या कारकिर्दीबद्दल एबी डीव्हिलियर्सचे खास अभिनंदन. मैदानावर व मैदानाबाहेर अतिशय उमदा खेळाडू म्हणून त्याने ओळख प्रस्थापित केली. भविष्यातील वाटचालीबद्दल शुभेच्छा.

-माजी श्रीलंकन कर्णधार महेला जयवर्धने
आधुनिक क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडू ठरलेला डीव्हिलियर्स अनेक खेळाडूंसाठी प्रेरणास्थान राहिला. सेकंड इनिंग्जमधील त्याची वाटचाल उत्तम राहील, ही सदिच्छा.
-भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण
एबी डीव्हिलियर्स हा खऱया अर्थाने मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील क्रिकेटचा ब्रँड ऍम्बेसिडर राहिला. त्याची खेळाप्रती समर्पित भावना वाखाणण्याजोगी राहिली. केवळ संघसहकाऱयांसाठीच नव्हे तर प्रतिस्पर्ध्यांसाठीही तो रोल मॉडेल ठरत आला.
-आरसीबीचे चेअरमन प्रथमेश मिश्रा
एबीडीच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप
फलंदाजी / सामने / धावा / सर्वोच्च / सरासरी / शतके /अर्धशतके
कसोटी / 114 /8765 / 278ना. / 50.7 / 22 / 46
वनडे / 228 / 9577 / 176 / 53.5 / 25 / 53
टी-20 / 78 / 1672 / 79ना. / 26.1 / 0 / 10 आयपीएल / 184 / 5162 / 133ना. / 39.7 / 3 / 40









