पुढील आठवड्यात पाणी वाटपाचे नियोजन
संकेश्वर : हुक्केरी तालुक्यातील राजा लखमगौडा जलाशयात शुक्रवारी 36.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झाली नाही. त्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आलेले नाही. असे असले तरी मागणीचा अंदाज घेत पुढील आठवड्यात पाणी वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे. सध्या नियमित पाण्याच्या पुरवठ्यासाठी 60 क्युसेक पाणी जलाशयातून सोडले जात आहे, अशी माहिती जलाशय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जलाशयातील संचित पाणी नियोजनबद्धरित्या पुरविले जाणार आहे. हिरण्यकेशी व घटप्रभा नदीला महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातील पाणी आल्याने नदीकाठ भागाला जीवदान मिळाले आहे. या पाण्यावरच जलाशय 85 टक्के भरण्यास मदत झाली आहे. हिरण्यकेशी नदीवर अवलंबून असणारी तलाव भरणी योजना यशस्वी झाली आहे. मात्र तालुक्यातील विहिरी, नाले, ओढे, कोरडे पडले आहेत. सध्या जलाशयात 36.5 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरेल, असे सांगता येणार नाही.









