न्हावेली / वार्ताहर
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा ३५ वा मासिक कार्यक्रम रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात श्री. रमेश गावडे यांच्या ‘ज्ञानगंगा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांचे हस्ते होईल, तर प्रसिद्ध चित्रकार प्रकाश कब्रे सर या कार्यक्रमास उपस्थित राहतील. रमेश गावडे हे गुळदुवे येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. या कवितांमधून मुलांना आनंददायी शिक्षण मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार कट्ट्याचे सदस्य कथाकथन ही करतील. तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.









