महाराष्ट्राची वाटचाल छ. शिवाजी महाराजांच्या विचारांने सुरू आहे –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
रायगड- प्रतिनिधी
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मराठी तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर आज ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा झाला. गेल्या दोन दिवसापासून सायंकाळी पडणाऱ्या पाऊसाने गडावरील दाट धुके, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार अत्यंत मंगलमय आणि आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावर आज (२० जून) तिथी प्रमाणे शिवराज्याभेषीक दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. पहाटेच्या मंगलमय वातावरणात सनई चौघड्याचे मंगलमय सूर, ढोल ताशांचा गजर आणि छ. शिवरायांचा जयघोषात या सोहळयाला प्रारंभ झाला.
छ.शिवरायांच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक होताच जमलेल्या हजारो शिवभक्तांनी छ. शिवाजी महाराज की जय अशी एकच ललकारी दिली.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदषीला छ. शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावर आपला शिवराज्याभिषेक साडेतिनशे वर्षापूर्वी केला. या शिवराज्याभिषेकाचा वर्धापनदिन शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी या सोहळ्याचे भव्य आयोजन शासनाच्या सहकार्याने करण्यात आले होते. किल्ले रायगडवरील राजदरबारात असलेली मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती. गडावर दोन दिवस विवीध धार्मिक विधी, पुजापाठ, वेद मंत्रघोशाने रायगडावरील वातावरणमंगलमय झाले होते. गडावरील विविध देवी देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली,महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरूवात झाली. शिवरायांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन करण्यात आल्यानंतर छ.शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधुंच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. सुर्योदयाच्या वेळीचे आल्हादायक वातरवरण आणि शिवप्रेमिं मधील अलोट उत्साह यामुळे रायगडावर वेगळेच उल्हासीत वातावरण निर्माण झाले होते. शिवकालीन पांरपारीक वेशभुषेतील मराठमोळ्या महिला आणि शिवभक्त, वा-यावर फडकणारे भगवे ध्वज, छ. शिवाजी महाराजांचा जयघोष, आणि ढोल, ताशे, तुतारीचे स्वर यांने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खा.सुनील तटकरे, आ.भरतशेठ गोगावले, आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी सहा वाजता. शिवराज्याभिषेकाच्या धार्मिक विधीना सुरूवात झाली. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात वेदउच्चारासोबत छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा सिंहासनाधिष्टीत करण्यात आली. सिंहासनावर आरूढ झालेल्या छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. हा क्षण उपस्थित शिवभक्तांची उत्कंठा शिगेला नेऊन ठेवणारा होता. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्याचा अभिषेक होताच संपुर्ण रायगडवर एकच जल्लोष साजरा झाला. जय भवानी, जय शिवराय च्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमुन गेला. ढोल ताशांच्या गजरात हजारो शिवभक्त बेधुंद हेाऊन नाचू लागले. भगवे झेंडे, तलवारी, भाले आकाशाच्या दिशेने उंच करीत शिवभक्तांनी आपला आनंद व्यक्त केला. या सोहळ्याची सांगता पालखी मिरवणुकीने करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छ.शिवाजी महाराज यांना अभिवादन करून म्हणाले, छत्रपती शिवरायांनी स्वराज्यातून सुराज्य निर्माण केले. शिवरायांची हि संकल्पना प्रत्यक्षात आणून सुराज्य निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य हे छ. शिवरायांच्या विचारांवर वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. शिवाय महाराष्ट्रातील गडकिल्ले जागतिक वारसा यादी मध्ये समावेश करण्यात येईलअसा विश्वास देखील व्यक्त केला. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा जितके दिवस कराल तितका कमी पडेल. कारण महाराजांचे कर्तुत्व आणि त्याग मोठा आहे. तर आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची मनापासून काळजी घेतली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. महाराजांनी स्थापन केलेल्या राज्य हे लोक कल्याणकारी राज्य होतं. शेतकऱ्यांच्या गोरगरिबाच्या कष्टकऱ्यांच्या नुकसान होईल महाराजांनी घेतला नाही असे अजित दादा पवार म्हणाले.
व्हीआयपी नेत्यांच्या आगमनामुळे सामान्य शिवप्रेमींचे हाल झाले. तरीही हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री खासदार आमदार उपस्थित होते. त्याचबरोबर विविध विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते , त्यामुळे रायगड रोपवे काही काळ सामान्य शिवप्रेमींसाठी बंद ठेवण्यात आला होता. तसेच सुरक्षेच्या कारणावरून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरच वाहने थांबवण्यात आली होती, यामुळे हजारो शिवप्रेमींवर पायी चालत जाण्याची वेळ आली तसेच रोपवे मध्ये प्रवेश नसल्याने असंख्य शिवप्रेमींना गडावर न जातात परत जावे लागले.