अजूनही 4,500 रडारवर, सायबर क्राईम रोखण्यासाठी मोठी कारवाई
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारमध्ये सायबर क्राईमच्या वाढत्या घटना पाहता आर्थिक गुन्हे विभागाने जोरदार मोहीम सुरू केली आहे. ‘ईओयू’ म्हणजेच आर्थिक गुन्हे युनिटने 3 हजार 500 सिमकार्ड ब्लॉक केले आहेत. हे सर्व सिमकार्ड फसवणुकीसाठी वापरले जात होते. विशेषत: ऑनलाईन फसवणुकीसह अन्य गुह्यांमध्ये त्यांचा बिनदिक्कतपणे वापर केला जात होता. तसेच यातील अनेक सिमकार्ड इतर राज्यातील गुंडांच्या टोळ्या चालवण्यासाठी वापरले जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आर्थिक गुन्हे युनिटने केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाला विशेष विनंती करून सिमकार्ड सेवा देणाऱ्या कंपन्यांमार्फत ही सर्व सिमकार्ड कायमची बंद केली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान, गेल्या काही महिन्यांत सुमारे 8000 सिमकार्ड संशयास्पद सापडले. सद्यस्थितीत त्यापैकी 3,500 कार्डे ब्लॉक करण्यात आली आहेत, तर इतर 4,500 कार्ड ब्लॉक करण्यासाठी केंद्र आणि संबंधित कंपन्यांना पत्रे लिहिण्यात आली आहेत. सदर सिमकार्ड खरे नाव आणि पत्त्याऐवजी बनावट नाव आणि पत्त्याच्या आधारे घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. काही लोकांकडून त्यांच्या नकळत त्यांच्या आधारकार्डचा वापर करून सिमकार्ड घेण्यात आले. इतर काही राज्यांमध्येही एक ओळखपत्र वापरून सिम खरेदी करून सायबर गुह्यांमध्ये बिनदिक्कतपणे वापर केला जात होता.









