सांगली / सुभाष वाघमोडे :
ग्रामीण जनतेच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जलजीवन मिशन कामासाठी तुटवडा निर्माण झाला आहे. सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रक्कम शासनाकडे थकीत आहे. कामासाठी निधी नसल्याने ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडली आहेत.
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, उन्हाळ्यात तर लोकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. प्रत्येकवर्षी हजारावर वाड्यावस्त्या आणि दोनशेवर गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी आणि टँकरमुक्त जिल्हा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन ही योजना सुरू केली. केंद्र व राज्याकडून या योजनेच्या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात नळपाणी योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेतून जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठ्याची कामे सुरू आहेत. या योजनेतून 638 कामांना मंजुरी देवून ही कामे सुरू केली होती. सुमारे सहाशे कोटीवर खर्च या कामांवर अपेक्षित आहेत. सुरूवातीला काही प्रमाणात निधीची उपलब्धता झाली. काही कामे मार्गी लागली. मात्र अलीकडे दोन वर्षापासून या योजनेच्या कामाला शासनाकडून निधी मिळाला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर एक दमडाही निधी आला नसल्याने सध्या सर्व कामे बंद पडली आहेत. या योजना पूर्ण होण्यासाठी किमान तीनशे ते साडेतीनशे कोटी इतक्या रक्कमेची गरज आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून निधीची उपलब्धता झाली नसल्याने ठेकेंदारांनी कामे बंद ठेवली आहेत. निधीसाठी ठेकेदारांच्या जिल्हा परिषदेकडे चकरा सुरू आहेत.
- ठेकेदार झाले कर्जबाजारी
संबधित ठेकेदारांनी सुरूवातीला स्वत:कडील तसेच प्रसंगी कर्जे काढून योजनांच्या कामासाठी पैसे उपलब्ध केले. आता मात्र गेल्या वर्ष–दीड वर्षापासून शासनाकडून निधीच मिळणे बंद झाल्याने ठेकेदारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. परिणामी त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
- मंत्रालयात ठेकेदारांना प्रवेश बंदी
लाडकी बहिण योजनेमुळे राज्यावर मोठा आर्थिक बोजा पडला याचा परिणाम इतर शासकीय योजनांवर होताना आहे. शासनाने सुरू केलेल्या अनेक योजना निधीअभावी रखडत आहेत. यातील जलजीवन ही एक योजना आहे. या योजनेच्या निधीसाठी जिल्ह्यातील ठेकेदार मंत्रालयामध्ये गेले होते, मात्र पाणीपुरवठा मंत्री आणि त्यांच्या संबधित अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेणे टाळले, तुम्ही इकडे येवू नका अशी उत्तरे त्यांना देण्यात आले.








