प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन हे शासनामध्ये विलिनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून संघटना विरहीत कर्मचाऱयांनी एसटीचा संप सुरू केला आहे. या पहील्या दिवसाच्या संपामुळे कोल्हापूर आगारातील 300 गाडया डेपोत थांबून असून, 1200 फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे कोल्हापूर आगारातील 30 लाखाच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे. कर्मचाऱयांना शासनाच्या समितीचे परिपत्रक मान्य नसल्याने, हा संप सुरूच राहणार आहे.
रविवारी मध्यरात्रीनंतर कोल्हापूर आगारातील 12 पैकी 10 आगारातील कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत. या आगारासह विभागीय कार्यालय, ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळा व गोकूळ शिरगांव येथील टायर प्लँन्टमधील सुमारे 4500 कर्मचाऱयापैकी 4000 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. कागल व गारगोटी येथील आगार सुरू होते, पण दुपारनंतर कागल आगार ही बंद झाले. सकाळी 10 नंतर या सर्व आगारातील कर्मचारी एकत्र येऊन मध्यवती बस स्थानकाच्या प्रवेशव्दाराजवळ आंदोलन सुरू केले. यामध्ये महीला कर्मचाऱयांचाही मोठा सहभाग आहे.
अर्थखात्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, परिवहन खात्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव यांची समिती करावी असे निवेदन शासनाने न्यायालयाकडे केले आहे. पण कर्मचाऱयांना हे परिपत्रक मान्य नसल्याने, हे महामंडळ शासनामध्ये विलिनीकरण करावे अशी मुख्य मागणी असल्याने, हा संप मागे न घेण्याचा निर्धार कर्मंचाऱयांनी केला आहे. या एसटी संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. यासाठी जादा पैसे देऊन पर्यायी मार्गाचा अवलंब प्रवाशी करत आहेत.
जादा भाडे घेणाऱयांची चौकशी कराः परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू असल्याने, खासगी बस व्यावसायिकाकडून जादा पैसे घेतले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. जादा भाडे घेणाऱयांची चौकशी करणार आहे.
प्रवाश्यांना वेठीस धरू नये-पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन
एसटी कर्मचाऱयांच्या मागण्याबाबत महाआघाडी सरकार सकारात्मक आहे. कर्मचाऱयांच्या मागण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. संपामुळे कर्मचाऱयांना वेठीस धरू नये.









