केवळ 15 हजार क्विंटल बियाणांचे वितरण : पावसाअभावी मागणी थंडावली : कृषी खात्याचे उद्दिष्टदेखील लांबणीवर
बेळगाव : पाऊस लांबणीवर पडल्याने कृषी खात्याचे अपेक्षित उद्दिष्टदेखील लांबणीवर पडले आहे. 50875 क्विंटल बी-बियाणांचा साठा केला आहे. त्यापैकी केवळ आतापर्यंत 15382 क्विंटल बी-बियाणे वितरित झाली आहेत. पावसाअभावी यंदा बी-बियाणांचा साठा रयत संपर्क केंद्र व कृषी पत्तीन संघामध्ये पडून आहे. दमदार पावसानंतरच बी-बियाणांची मागणी वाढणार आहे. जिल्ह्यात 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 3.62 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. अद्याप पेरणीचे उद्दिष्ट निम्म्यांहून अधिक शिल्लक आहे. जुलैचा पहिला आठवडा संपला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणीची कामे रखडली आहेत. परिणामी बी-बियाणांची मागणीदेखील थंडावली आहे. त्यामुळे बी-बियाणांचा साठा खात्याकडे पडून असल्याचे दिसत आहे.
बी-बियाणे जागीच पडून
गतवर्षी जुलै महिन्यात पेरणीचे उद्दिष्ट बऱ्यापैकी पूर्ण झाले होते. शिवाय बियाणांची उचलही वेळेत झाली होती. मात्र यंदा पावसाअभावी पेरणीचे उद्दिष्टही वेळेत पूर्ण झाले नाही. शिवाय बियाणेदेखील जागीच पडून असल्याचे पहावयास मिळत आहे. खरीप हंगामात भात, सोयाबीन, मका, सूर्यफूल, भुईमूग, मूग, तूर, उडीद, हायब्रीड भात, नाचणी, कापूस, तंबाखू, बटाटा आदी पिकांची पेरणी व लागवड होते. मात्र पावसाअभावी पेरणी खोळंबल्यामुळे निम्म्याहून अधिक पेरणीचे उद्दिष्ट अद्याप शिल्लक आहे. जिल्ह्यात 35 रयत संपर्क केंद्रे, 14 पीकेपीएस व तात्पुरती केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्रातून बी-बियाणे, कीटकनाशक व खताचा पुरवठा केला जात आहे. मात्र पावसाअभावी शेतकऱ्यांकडून म्हणावी तशी बी-बियाणे व खताची मागणी नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे रयत संपर्क केंद्र आणि इतर केंद्रांमध्ये बी-बियाणे, खते पडून असल्याचे पहावयास मिळत आहे. अद्यापही कृषी खात्याकडे 35493 क्विंटल बी-बियाणे शिल्लक आहेत.
35493 क्विंटल बियाणांचा साठा शिल्लक
पावसाअभावी बी-बियाणे, खतांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे 35493 क्विंटल बियाणांचा साठा शिल्लक आहे. केवळ 15 हजार क्विंटल बी-बियाणे आतापर्यंत वितरित झाली आहेत. खात्याकडे बी-बियाणांचा साठा मुबलक आहे.
– शिवनगौडा पाटील (सहसंचालक, कृषी खाते)









