माजी आमदार अंजली निंबाळकर यांची माहिती : विकासासाठी कायम प्रयत्नशील
खानापूर : मी आमदार म्हणून कार्यरत असताना विकास हाच दृष्टीकोन ठेवून सरकारदरबारी विकासकामांचा पाठपुरावा केला होता. यात तालुक्यातील 35 ग्रामीण संपर्क रस्ते आणि चार पुलांच्या विकासाचे काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणि ग्रामीण पंचायत राज विकास विभागाच्या अनुदानातून मंजूर झालेले हे रस्ते वापरासाठी सज्ज झाले असून जनतेला दिलेला शब्द पाळल्याचे समाधान वाटत आहे, अशी माहिती माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, अतिवृष्टीमुळे खराब रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे ऊग्णसेवा तसेच दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला होता. खराब रस्त्यामुळे वाहतुकीची साधने उपलब्ध होत नसल्याने जंगलातून पायपीट करावी लागत होती. या समस्यांची दखल घेऊन राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून 35 रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत. मंग्यानकोप ते भेंडेवाडी रस्ता, गंदिगवाड ते तिगडोळी रस्ता, गंदिगवाड, क. बागेवाडी रस्ता, व•sबैल संपर्क रस्ता, हिरेहट्टीहोळी-चिक्कहट्टीहोळी, देमिनकोप्प रस्ता, नरसेवाडी संपर्क रस्ता, उचवडे ते मंदिर रस्ता, जांबोटी ग्रा. पं. पंचायत रस्ता, होनकल संपर्क रस्ता, होनकल कौंदल रस्ता, घार्ली रस्ता, अकराळी रस्ता, तिवोली रस्ता व पूल, शिरोली डोंगरगाव रस्ता, बांदेकरवाडा रस्ता, ओत्तोळी संपर्क रस्ता, जामगावचा पूल, मोहिशेत पूल, पारिश्वाड गावातील दोन रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कामशिनकोप रस्ता, केरवाड गावाजवळ 300 मीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. भालके गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि बैलूर ते गोल्याळी या रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. महत्त्वाचे म्हणजे बिडी-लिंगनमठ या प्रमुख रस्त्याचे 8 कि. मी. डांबरीकरण पूर्ण झाले आहे.
मंजूर कामाची पूर्तता करणे गरजेचे
मी आमदार म्हणून कार्यरत असताना पाठपुरावा केलेल्या कामांची पूर्तता झाल्याने मला समाधान वाटत आहे. विरोधी पक्षाचे सरकार असतानादेखील मी सातत्याने पाठपुरावा करून अनेक विकासकामे मंजूर करून घेतलेली आहेत. त्याची पूर्तता करून घेणे गरजेचे आहे. काँग्रेस सरकार सत्तेवर असल्याने मी खानापूर तालुक्याच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे.









