33 प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश, गतवर्षीही पाच महिन्यांत झाली होती 35 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद
पणजी : गोवा हे एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असले तरी राज्यात महिलांविऊद्ध वाढते गुन्हे चिंतेचा विषय बनत चालला आहे. यामुळे राज्यातील मुली, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्र ऐरणीवर आहे. राज्यात गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच जानेवारी ते मे या महिन्यांत एकूण 35 बलात्कारांची नोंद करण्यात आली आहे. यातील 33 प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिकांना यश मिळाले आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत उत्तर गोव्यात बलात्कारांचे 19 गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यातील 18 गुह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तर दक्षिण गोव्यात बलात्कारांचे 16 गुन्हे नोंदविण्यात आले होते.
त्यातील 15 गुह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. गतवर्षी म्हणजेच 2023 मध्ये जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीतदेखील 35 बलात्कारांचे गुन्हें नोंदविण्यात आले होते. त्यातील 34 प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले होते. उत्तर गोव्यात बलात्कारांचे 20 गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यातील 19 गुह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले होते. त्याचप्रमाणे दक्षिण गोव्यात 15 बलात्करांचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यातील 15 ही गुह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले होते. बलात्कार, बलात्कारानंतर खून, विनयभंग, अनैसर्गिक संबंध, सामूहिक बलात्कार, गंभीर दुखापत, पती किंवा त्यांच्या नातलगांनी त्रास देणे, अनुमतीशिवाय गर्भपात, हुंड्यासाठी छळ, अपहरण, कामाच्या ठिकाणी त्रास, सायबर गुन्हेगारीतून फसवणूक, असे अनेक गुन्हे महिलांबाबतीत आज घडताना दिसत आहे.
स्त्रियांच्या संरक्षणासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. परंतु, सरकारच्या काही प्रयत्यांना यश मिळत नसल्याचे चित्र राज्यात घडत असलेल्या प्रकारांतून दिसून येत आहे. तरी राज्यातील पोलिस अशा प्रकरणांवर आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत असून राज्याच्या हितासाठी कार्य करत आहे. दरम्यान, समाजातील वाईट प्रवृत्तीच्या विरोधात कार्य करणारी संस्था ‘उजवाड द रेयस ऑफ हॉप’च्या अध्यक्ष प्रा. सेंन्ड्रा परेरा यांनी याबाबत आपली मते दै. तऊण भारतशी बोलताना व्यक्त केली आहे. उजवाड संस्थेतर्फे समाजात विनयभंग, बलात्कार याविषयी जनजागृती मोहीम, लैंगिक संवेदना आणि स्वसंरक्षण यावर केंद्रित कार्यक्रम तयार केले जात आहेत. ज्यामुळे जनतेला तसेच शालेय विद्यार्थ्यांना याबाबत शिक्षित करता येणार आहे.
या गोष्टी आवश्यक…
- पोलिसांची गस्त वाढविणे, आणि अत्याचाराच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी समर्पित कार्य दलाची निर्मिती आणि सुरक्षा वाढविण्यावार भर.
- बलात्काऱ्यांना कठोर दंड ठोठावणे यासारख्या कायदेशीर आणि न्यायिक सुधारणात कसलाच विलंब करता कामा नये.
- सर्वसमावेशक पुनर्वसन कार्यक्रमांसह, वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर साहाय्य देणाऱ्या अधिक समर्थन केंद्राद्वारे पीडितांसाठी समर्थन वाढविणे आवश्यक.
- शाळा, महाविद्यालयांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्वसंरक्षणाचे प्राथमिक ज्ञान आणि समुदाय प्रतिबद्धता अत्यावश्यक.
कायद्यांची अंमलबजावणी बळकट करणे महत्वाचे
एकेकाळी सुरक्षितता आणि सुरक्षेसाठी गोव्याची ओळख होती. परंतु, गोवा आता गंभीर गुह्यांसाठी ओळखला जातो. विशेषत: बलात्कारांसारखे प्रकार राज्यात घडत आहे. गेल्या पाच महिन्यांतील 35 बलात्काराच्या घटना राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत आहे. त्यामुळे कायद्यांची कडक अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे. विद्यमान कायदे आणि धोरणांचे सखोल पुनरावलोकन, कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी संसाधन हे उपाय प्रभावीपणे अंमलात आणले तर सुरक्षित गंतव्यस्थान म्हणून गोव्याची प्रतिष्ठा राखली जाईल.
– सेंन्ड्रा परेरा, उजवाड संस्था अध्यक्ष.