रशिया -युक्रेन युद्धाचा प्रभाव : 10 ते 12 लाख कामगारांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. दोन महिन्यांपूर्वी जी-7 देशांच्या बैठकीत रशियन जहाजे, विमाने आणि रशियन हिऱ्यांवरही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सुरतमधील हिऱ्यांचा व्यवसाय सुमारे एक तृतीयांशने कमी झाला. साधारणपणे 10-12 लाख कामगारांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आणि सुमारे 20,000 कामगार कमी करण्यात आल्याची माहिती आहे. सुरतच्या हिरे उद्योगाची वार्षिक उलाढाल 3.3 लाख कोटी आहे. रशियावरील निर्बंधांमुळे, या उद्योगाचे कामकाज 30-35 टक्क्यांनी कमी झाले आहे. त्याच प्रमाणात कंपन्यांचे उत्पन्न आणि वेतनही घटले आहे. गुजरात डायमंड वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष भावेश टंक यांनी सांगितले की, रशियावरील निर्बंधामुळे 10-12 लाख डायमंड कटिंग-पॉलिशिंग कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.
अमेरिकेच्या निर्बंधांचा मोठा फटका
अमेरिकेने रशियन हिरे आणि त्यांच्यापासून बनवलेल्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या मते, 2022-23 मध्ये भारताच्या दागिन्यांच्या निर्यातीत अमेरिकेचा 33.2 टक्के हिस्सा होता. अशा परिस्थितीत सुरतमधील रशियन हिऱ्यांपासून बनवलेल्या वस्तूंची सर्वात मोठी बाजारपेठ बंद झाली आहे. तीन महिन्यांत हिऱ्यांच्या निर्यातीत 29.37 टक्के घट झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत देशातून 36,723 कोटी रुपयांचे कट आणि पॉलिश केलेले हिरे निर्यात करण्यात आले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील निर्यातीच्या तुलनेत हे प्रमाण 29.37 टक्के कमी आहे. एकूण हिरे आणि दागिन्यांची निर्यात 28.08 टक्क्यांनी घसरून 60,222 कोटी रुपये झाली.
हिरे कामगार काळजीत
तीन महिन्यांत हिरे उद्योगाशी संबंधित सुमारे 10 कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील बहुतांश कामगार अनेक पिढ्यांपासून हे काम करत आहेत. ते फार शिकलेले नाहीत, त्यामुळे त्यांना इतर कामे करता येत नाहीत. लहान हिरे कापण्यासाठी आणि पॉलिश करण्यासाठी त्यांना प्रति हिरा 6-30 रुपये मिळतात. 50,000 ते 4 लाख रुपयांना विकले जाणारे मोठे हिरे पॉलिश करण्यासाठी त्याला 600-1800 रुपये मिळतात परतुं हा रोजगार बंद झाला तर या कामगारांच्या समोर मोठी समस्या निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत.









