स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निधी मंजूर : लवकरच उपकरणे खरेदी केली जाणार
प्रतिनिधी / बेळगाव
मागील काही वर्षांपासून पॅन्टोन्मेंटला केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. विकासकामासाठी निधी नाही, पण स्वच्छतेसाठी निधी मंजूर करून यंत्रोपकरणे खरेदी करण्याची सूचना केंद्र शासनाने केली आहे. विविध उपकरणे खरेदीकरिता 35 लाखाचा निधी पॅन्टोन्मेंटला मंजूर केला आहे.
विकासकामे राबविण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी पॅन्टोन्मेंटकडून केंद्र आणि राज्य शासनाकडे करण्यात येत आहे. याकरिता वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला पण केंद्र व राज्य शासनाकडून कोणताच निधी मंजूर करण्यात आला नाही. परिणामी पॅन्टेन्मेंट परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे पाणी बिल, पथदीपाचे बिल थकले आहे. तसेच कोणतीच विकासकामे केली जात नाहीत. त्यामुळे पॅन्टोन्मेंटवासियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
केवळ यंत्रोपकरणासाठीच वापर
नागरी वसाहतींचा समावेश महापालिकेत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे निधी मंजूर करण्याकडे केंद्र शासनाने टाळाटाळ चालविली आहे. मात्र स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत स्वच्छतेसाठी 35 लाखांचा निधी मंजूर केला आहे. स्वच्छता उपक्रमांतर्गत विविध साहित्य आणि यंत्रोपकरणे खरेदी करण्यासाठी या निधीचा वापर करावा, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे पॅन्टोन्मेंटला या निधीचा वापर केवळ यंत्रोपकरणे खरेदी करण्यासाठीच करावा लागणार आहे. अन्य कारणासाठी या निधीचा वापर करता येणार नाही. याअंतर्गत लवकरच उपकरणे खरेदी केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









