जमियत उलेमा इस्लाम’च्या सभेत स्फोट; 200 जखमी
► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्यातील बाजौरमध्ये रविवारी एका राजकीय सभेदरम्यान दहशतवाद्यांनी एका राजकीय सभेमध्ये आत्मघाती स्फोट घडवत हाहाकार निर्माण केला. सभेतील गर्दीमध्ये झालेल्या या भीषण स्फोटात 35 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 200 लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या जमियत उलेमा इस्लाम-फजल (जेयुआय-एफ) या पक्षाच्या सभेमध्ये स्फोट घडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच जखमी आणि मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘जेयुआय-एफ’ चे ज्येष्ठ नेते हाफिज हमदुल्ला रविवारी बाजौर येथे आयोजित सभेला संबोधित करणार होते. या सभेसाठी शेकडो लोक गोळा झालेले असतानाच हमदुल्ला सभास्थळी दाखल होण्यापूर्वी आत्मघाती स्फोट झाला. स्फोटानंतर घटनास्थळीच काही जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून येत होते. तसेच मोठ्या आवाजानंतर लोक सैराभैरा पळत असल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. या स्फोटात ‘जेयुआय-एफ’चे सुमारे 35 कार्यकर्ते ठार झाल्याचे हाफिज हमदुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आपण या घटनेचा निषेध करतो. अशा हल्ल्यांनी आमचे मनोबल खचणार नाही. असे हल्ले यापूर्वीही होत आले आहेत. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. सभांना कोणत्याही प्रकारची सुरक्षाही दिली जात नसल्याचा मुद्दा आम्ही संसदेत मांडू, असेही ते पुढे म्हणाले.
हल्ल्यामागे कोण?“ `
जेयुआय-एफ ही कट्टर इस्लामी संघटना असून त्यांचे तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि अफगाण तालिबानशी जवळचे संबंध असल्यामुळे या भागात तालिबान्यांनी हल्ला केला असण्याची शक्मयता कमी आहे. साहजिकच तालिबानने हल्ला केला नाही तर त्यामागे कोणाचा हात आहे याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
पाकिस्तानात दहशतवाद वाढला
या वर्षात पाकिस्तानमध्ये अनेक स्फोट झाले असून, त्यापैकी बहुतांश आत्मघाती स्फोट होते. शिया मशिदीला लक्ष्य करून शेवटचे काही स्फोट झाले. काबूलमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर टीटीपीसारख्या दहशतवादी संघटना पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टीटीपीनेही सरकारसोबतचा युद्धविराम संपवल्यामुळे आगामी काळात आणखी प्राणघातक हल्ल्यांचा धोका वाढला आहे.









