मूळचे ओडिशातील रहिवासी : मुख्यमंत्री नवीन पटनायक सक्रीय
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
दक्षिण पूर्व आशियातील लाओस या देशात ओडिशाचे रहिवासी असलेल्या 35 कामगारांना बळजबरीने रोखण्यात आले आहे. या कामगारांनी एका व्हिडिओद्वारे सरकारचे लक्ष वेधले आहे. ज्या कंपनीत आम्ही काम करत होतो, त्याच कंपनीने कैदेत ठेवल्याचे या कामगारांनी म्हटले आहे.
संबंधित कंपनीचे काम दीड महिन्यांपूर्वीच संपविले होते, परंतु कंपनी आता आम्हाला मायदेशी परतू देत नाही तसेच आमचे शिल्लक वेतन देत नसल्याची तक्रार या कामगारांनी केली आहे.
आमच्याकडे पैसे नाहीत, यामुळे खायला अन्न देखील नाही. आम्हाला मायदेशी परत जाण्यापासून रोखण्यात आल्याचे एक कामगार सरोज पलाई यांनी सांगितले आहे. कंपनीने आमचे पासपोर्ट हिसकावून घेतले आहेत अशी व्यथाही या कामगारांनी मांडली आहे. ओडिशा सरकारने या व्हिडिओची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अधिकाऱ्यांना या कामगारांना मायदेशी आणण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य कामगार आयुक्तांनी लाओसमधील भारतीय दूतावासासमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. दूतावासाने कामगारांच्या सुखरुप मायदेश वापसीसाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात येणार असल्याचे ओडिशा सरकारला कळविले आहे.
लाओसच्या कंपनीत काम करणाऱ्या भारतीय कामगारांनी स्वत:ची आपबीपी एका व्हिडिओद्वारे स्वत:च्या गावातील लोकांपर्यंत पोहोचविली. यानंतर गावातील लोकांनी स्थानिक आमदाराकडे धाव घेत या घटनेची माहिती दिली आहे. आमदाराने राज्य सरकारशी संपर्क साधत लाओसमध्ये ओडिशातील लोकांवर अत्याचार होत असल्याची माहिती दिली आहे.