बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरी
बेळगाव : एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 35 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले आहेत. बसव कॉलनी येथे बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. बसव कॉलनी येथील काशिनाथ मारुती अप्पन्नावर गणेशोत्सवासाठी बसवकॉलनी येथील आपण रहात असलेल्या घराला कुलूप लावून हुक्केरी या आपल्या मूळगावी गेले होते. मंगळवार दि. 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी ते गावी गेले होते. बुधवारी सकाळी ते घरी परतले, त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य बनविले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.









