वायुदलप्रमुखांचे प्रतिपादन : एचएएल, खासगी क्षेत्राच्या मदतीने लक्ष्य गाठता येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताला दरवर्षी 35-40 लढाऊ विमानांची निर्मिती करावी लागणार आहे, जेणेकरून जुन्या विमानांना बदलता येऊ शकेल. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) पुढील वर्षापासून दरवर्षी 24 तेजस एमके1ए विमानांची निर्मिती करणार आहे. तसेच सुखोई निर्माण अन् खासगी क्षेत्राच्या भागीदारीतून हे लक्ष्य पूर्ण केले जाऊ शकते असे वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी म्हटले आहे.
वायुदलप्रमुखांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. भारतीय वायुदल स्वदेशी संरक्षण प्रणालींना प्राथमिकता देणार आहे, भले त्यांची क्षमता आंतरराष्ट्रीय पर्यायांपेक्षा काहीशी कमी असो. जर कुठलीही स्वदेशी यंत्रणा 85-90 टक्के क्षमता प्रदान करत असेल तर ती आम्ही स्वीकारू असे सिंह यांनी म्हटले आहे.
दीर्घकालीन युद्धाच्या स्थितीत भारताला स्वत:च्या संरक्षण उत्पादन क्षमता कायम राखाव्या लागणार आहेत. विदेशावरील निर्भरता एक रणनीतिक कमकुवतपणा ठरू शकते. भारतीय वायुदल वेगाने ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंगला स्वत:च्या सिस्टीममध्ये सामील करत आहे. यामुळे संचालनात सुधारणा होत असून वेळ वाचत असल्याचे वायुदलप्रमुखांनी चाणक्य डायलॉग्स संमेलनात बोलताना म्हटले आहे. भारत आता संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले टाकत असल्याचे वायुदलप्रमुखांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.
संशोधन अन् विकास प्रकल्पासाठी प्रतिबद्ध
स्वदेशी प्रणालीची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी असली तरी किंवा जागतिक बाजारपेठेत उपलब्ध प्रणालीच्या 90 टक्के किंवा 85 टक्के असली तरीही आम्ही स्वदेशी प्रणालीवरच जोर देऊ हा आमचा दृष्टीकोन पूर्णपणे स्पष्ट आहे. याच एकमात्र पद्धतीने आम्ही आमच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो असे वायुदलप्रमुख म्हणाले.









