गाझापट्टीत हमाससंबंधातील शस्त्रसंधी अल्पजीवी
वृत्तसंस्था / जेरुसलेम
इस्रायल आणि हमास यांच्यातील शस्त्रसंधी नेहमीप्रमाणेच अल्पजीवी ठरली आहे. हमासने इस्रायलच्या काही ओलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यामुळे संतप्त झालेल्या इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या वायुहल्ल्यात 345 हून अधिकजण ठार झाले असल्याचे प्रतिपादन हमासने केले आहे. या हल्ल्यात हमास सरकारचा प्रमुख इस्साम अल् डाली तसेच त्याचे इतर अनेक अधिकारीही ठार झाले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी इस्रायल आणि हमास यांनी तात्पुरती शस्त्रसंधी केली होती. या शस्त्रसंधी करारानुसार हमासने काही इस्रायली आणि अन्य देशांच्या ओलिसांची सुटका केली होती. तसेच इस्रायलनेही हमासच्या अनेक कैद्यांची मुक्तता केली होती. तथापि, मंगळवारी इस्रायलने पुन्हा हमासवर हल्ला केला. हमासने शस्त्रसंधीचा भंग केला असून ओलिसांना त्रास देण्याचे धोरण स्वीकारले आहे. ओलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जात आहे. त्यामुळे आता स्वस्थ बसणे शक्य नाही. त्यामुळे हा हल्ला करणे भाग पडले आहे, असे इस्रायलचे म्हणणे आहे.
अमेरिकेची घेतली अनुमती
मंगळवारी वायुहल्ले करण्यापूर्वी इस्रायलने अमेरिकेला याविषयी कळविले होते. तसेच अमेरिकेची अनुमती घेतली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. व्हाईट हाऊसनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मंगळवारी सकाळपासूनच अनेक इस्रायली विमानांनी गाझापट्टीत हमासचे दहशतवादी वास्तव्यास असणाऱ्या अनेक इमारतींवर बाँबफेक केली. किमान 40 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक नागरिक अजूनही पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अडकलेले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायलचा हा हल्ला मोठा होता.
इस्रायलचे आरोप
हमासने शस्त्रसंधी कराराप्रमाणे इस्रायली ओलिसांची सुटका करण्यास नकार दिला आहे. तसेच काही ओलिसांविरुद्ध त्यांना जीवे मारण्याचे कारस्थान केले आहे. शस्त्रसंधी कराराच्या इतर अटींचाही हमासकडून सातत्याने भंग होत आहे. त्यामुळे एकांगी पद्धतीने हमास शस्त्रसंधी मोडत असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी कारवाई करावी लागत आहे, असे वक्तव्य इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी वायुहल्ले केल्यानंतर सोशल मिडियावर दोन तासांनी केले आहे.
अनेक स्थानांवर हल्ले
मंगळवारी इस्रायलने गाझापट्टीत अनेक स्थानांवर अचूक लक्षवेधी वायुहल्ले चढविले. हमासची सत्ताकेंद्र उद्ध्वस्त होतील अशाप्रकारे हल्ले केल्याची माहिती देण्यात आली. काही रुग्णालयांच्या परिसरातही हल्ले करण्यात आले. या रुग्णालयाच्या आसऱ्याने हमासचे नेते इस्रायलच्या विरोधातील कारवाया करतात. रुग्णालयांवर बाँबफेक करता येत नसल्याने आपण सुरक्षित आहोत, असा त्यांचा समज असतो. तथापि, इस्रायलने नेमकेपणाने हल्ले करुन रुग्णहानी टाळली आहे.
इस्रायलवरील हल्ल्यातील ओलीस
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर 8 ऑक्टोबर 2023 च्या रात्री अचानक हल्ला करुन जवळपास 1 हजार 200 इस्रायली नागरिकांची हत्या केली होती. या नागरिकांमध्ये महिला आणि लहान मुले यांचाही समावेश होता. या हल्ल्यात महिलांवर अत्याचार करण्यात आले होते. तसेच 100 हून अधिक इस्रायली नागरिकांचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवण्यात आले होते. तेव्हापासून इस्रायल आणि हमास यांच्या प्रचंड संघर्ष होत आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांच्या पुढाकाराने गाझापट्टीत शस्त्रसंधी करार करण्यात आला होता. पण आता तो मोडला गेल्याने पुन्हा संघर्ष भडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती देण्यात आली. आतापर्यंत या संघर्षात गाझापट्टीत आतापर्यंत किमान 60 हजार लोकांनी प्राण गमावले आहेत. इस्रायलचे 100 हून अधिक सैनिकही धारातीर्थी पडले आहेत.









