पुणे / वार्ताहर :
लोणावळा पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गाजवळ कुसगाव येथे सापळा रचून बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडला. या ट्रकमधून 342 पोती गुटखा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी ट्रक चालक मोहम्मद खलील जमाल अहमद शेख (वय 40, रा. गुलबर्गा, कर्नाटक), ट्रक क्लिनर नसरुद्दीन बुरानसाहब खडखडे (35, रा. बिदर, कर्नाटक) व ट्रकमालक सदाम ऊर्फ सय्यद गुडुसाहब मुल्ला दस्तगीर (रा. गुलबर्गा, कर्नाटक) या तिघांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अधिनियमासह अन्न सुरक्षा व मानदे कायदा सन 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुसगाव येथे पोलिसांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आरआरबी कार्यालयाजवळ सापळा रचला. त्यावेळी कर्नाटक पासिंगचा ट्रक (केए-32 एए 1138) पुणे बाजूकडून मुंबईकडे जात होता. हा ट्रक पोलिसांनी थांबवून त्याची तपासणी केली. त्यामध्ये 10 लाख 67 हजार रुपयांचा 342 पोती गुटखा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी गुटखा आणि 15 लाखांचा ट्रक असा 25 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अधिक वाचा : उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश नाही








