रविवारी रात्री 112 जणांसह तिसरे विमान दाखल
वृत्तसंस्था/ अमृतसर
अमेरिकेतून हद्दपार केलेल्या 112 भारतीयांना घेऊन रविवारी रात्री तिसरे लष्करी विमान अमृतसर विमानतळावर पोहोचले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईचा भाग म्हणून निर्वासित लोकांना परत आणणारे हे तिसरे उ•ाण आहे. आतापर्यंत एकंदर तीन विमानांमधून एकूण 335 जण मायदेशी परतले आहेत. शनिवारी रात्री अमेरिकेतून 116 निर्वासितांना घेऊन दुसरे विमान अमृतसर विमानतळावर पाहोचले होते.
अमेरिकेचे सी-17 विमान रविवारी रात्री 10.03 वाजता भारतात दाखल झाल्याचे अमृतसरच्या जिल्हाधिकारी साक्षी साहनी यांनी सांगितले. तिसऱ्या विमानातून दाखल झालेल्या 112 निर्वासितांपैकी 44 हरियाणाचे, 33 गुजरातचे, 31 पंजाबचे, उत्तर प्रदेशचे दोन आणि उत्तराखंड व हिमाचल प्रदेशचा प्रत्येकी एक जण आहे. या नवीन तुकडीत 19 महिलांसह काही मुलांचाही समावेश आहे. विमान अमृतसर विमानतळावर उतरले तेव्हा काही लोकांचे कुटुंबीयही उपस्थित होते. इमिग्रेशन, पडताळणी आणि पार्श्वभूमी तपासणी यासारख्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर निर्वासितांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी योग्य व्यवस्थादेखील करण्यात आली होती.









