कोल्हापूर / विनोद सावंत :
सुरक्षित, जलद, संपूर्ण वातानुकूलित आणि अत्यंत आरामदायी अशी ओळख असणाऱ्या वंदेभारत रेल्वेला कोल्हापुरातून सुरवातील चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतू गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील प्रवाशांनी या रेल्वेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. केवळ 33 टक्केच सीट बुकींग होत असून 67 टक्के सीटा रिकाम्याच राहत आहेत. या उलट हुबळी–पुणे वंदेभारत रेल्वेस सुरूवातीपासून ते आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. सध्या 70 टक्के सीट बुकींग होत आहेत.
वंदे भारत रेल्वे कोल्हापूर ते मुंबई अशी सुरू व्हावी, अशी कोल्हापूरकरांची मागणी असताना 19 सप्टेंबरला कोल्हापूर–पुणे अशी वंदे भारत रेल्वे सुरू झाली. दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकात पोहोचते. तर प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी पुण्याहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास कोल्हापुरात येते.
कोल्हापूरहून गाडी सुटल्यानंतर मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकांवर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा आहे. या वंदे भारत एक्सप्रेसला एकूण आठ डबे आहेत. त्यामध्ये सात चेअर कार आणि एक एक्झिक्यूटिव्ह क्लास आहे. पाच डब्यांमध्ये प्रत्येकी 78 तर इंजिन जवळच्या दोन्ही बाजूंच्या डब्यात प्रत्येकी 44 आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये 52 आसन क्षमता आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या एका फेरीतून 530 प्रवाशांना प्रवास करू शकतात.
वेळेत बदल करण्याची गरज
कोयना एक्स्प्रेस आणि वंदेभारतची कोल्हापुरातून सुटण्याची वेळ एकच आहे. कोयनाचे दर कमी आहे. तसेच नोकरदार, व्यावसायिकाची प्रवाशांची पसंती या रेल्वेस आहे. तर कोल्हापुरातून सुटणारी वंदेभारत दुपारी 1 वाजता पुण्यात पोहोचते. यामुळे नोकरदार, व्यावसायिकांनी ही फारशी उपयोगी ठरत नाही. त्यामुळे वेळत बदल केला तर प्रवाशी संख्या वाढू शकते.
निम्म्याहून अधिक सिट रिकाम्या
19 ते 30 सप्टेंबर दरम्यान, चेअर कारच्या 50 टक्के सीट बुकींग होत्या. तर एक्झिक्यूटिव्ह क्लासामधील 76 टक्के सीट फुल्ल होत्या. 1 ते 19 ऑक्टोंबरपर्यंत चेअर कारच्या 42 टक्के तिकीट विक्री झाली असून एक्झिक्यूटिव्ह क्लासामध्ये निम्म्या सीट बुकींग झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून वंदेभारत अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. एकूण सीटपैकी केवळ 33 टक्के सीट बुकींग होत आहेत. उर्वरीत 67 टक्के सीट रिकाम्याच असतात. सुट्टी दिवशी यामध्ये 5 ते 10 टक्के वाढ होते. इतर वेळी मात्र हुबळीच्या तुलनेत कोल्हापूर–पुणे वंदेभारतला थंडा प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूर–मुंबई वंदेभारतच फायदाची
कोल्हापूर–मुंबई वंदेभारत रेल्वेचीच वास्तविक मागणी होती. तसा प्रस्तावही पाठविला आहे. परंतू कोल्हापूर–पुणे वंदेभारत सुरू झाली. कोल्हापूर–मुंबई वंदेभारत सुरू झाल्यास नक्कीच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
कोल्हापूर–मुंबई वंदे भारतमधील अडथळे
वंदेभारतसाठी स्वतंत्र ट्रॅक आवश्यक असतो. यासाठी कोल्हापूर–मुंबई दुहेरीकरण होणे आवश्यक आहे. तसेच कोल्हापूर–मुंबई वंदेभारत रेल्वेचा मेंटनन्सची सुविधा कोल्हापूर स्टेशनावर नाही. सध्याच्या वंदेभारत ट्रेन 130 किलीमीटर ताशी वेगाने धावू शकते. परंतू त्या सुविधेचा रेल्वे ट्रॅक नसल्याने सध्या 110 किलीमीटर वेगाने रेल्वे धावत आहे. कोल्हापूर–मुंबई वंदेभारतसाठी दर्जेदार ट्रॅक नसल्याचाही अडथळाच आहे.
कोल्हापूर–पुणे वंदेभारत रेल्वेस सध्या प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कोल्हापूर–मुंबई वंदेभारत सुरू करण्यासाठी यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी काही बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. दिल्लीतूनच यावर निर्णय होणार आहे. पुणे–मिरज मार्गावरील कोरेगाव, रहीमतपूर आणि तारगांव येथील स्टेशनच्या परिसरातील दुहेरीकरणाची कामे बाकी आहेत. यापैकी दोन स्टेशनच्या येथील दुहेरीकरणाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होईल.
विवेक पोद्दार, वाहतूक निरिक्षक, मिरज विभाग








