7,866 लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर : बचावकार्य सुरूच
वृत्तसंस्था/ सोल
दक्षिण कोरियात मागील 7 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण कोरियात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पाणी साचल्याने आतापर्यंत 33 जणांना जीव गमवावा लागाल आहे. तर 7,866 जणांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे.
च्योंगजू भागात रविवारी एका भुयारीमार्गात पाणी शिरल्याने तेथे बससमवेत 15 वाहने अडकून पडली. तेथे बसमधून आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह हस्तगत झाले आहेत. तर एका वाहनात चालकाचा मृतदेह आढळून आला आहे. या लोकांना योग्यवेळी बाहेर पडता न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांचे मानणे आहे. तर 10 जण अद्याप बेपत्ता आहेत.
अतिवृष्टीमुळे दक्षिण कोरियातील नद्यांना पूर आला आहे. सर्वाधिक 17 बळी ग्योंगसँग प्रांतात गेले आहेत. तेथे जोरदार प्रवाहामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. तर उत्तर चुंगचेयोंगमध्ये गोसेन धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे आसपासच्या गावांमधून लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. 25,470 घरांमध्ये आठवडाभरापासून वीजसेवा नाही. खराब हवामानामुळे अनेक विमानो•ाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच रेल्वेमार्गांवर पाणी साचल्याने रेल्वेगाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. तर 200 मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गृह मंत्रालयाकडून देण्यात आली.
सार्वजनिक मालमत्तांना या पूरसंकटामुळे मोठे नुकसान झाले आहे. 17 रस्ते वाहून गेले आहेत. तर खासगी मालमत्तांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटादरम्यान पंतप्रधान हान डक-सू यांनी सर्व उपलब्ध साधनसामग्री जमविण्याचे आदेश दिले आहेत. तर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सूक येओल हे युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथूनच अधिकाऱ्यांना पूरात अडकलेल्या लोकांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.