फ्रान्स, अमेरिकेत सापडलेले प्रत्येकी 7 बाधित, मलेशियातही एक
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या रुपाने आता जगभरात आपले हातपाय झपाटय़ाने पसरण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिका आणि फ्रान्समध्ये प्रत्येकी 7 नवे रुग्ण आढळले असून मलेशियातही एका रुग्णाचा शोध शुक्रवारी लागला. फ्रान्समध्ये 13 संशयितांची तपासणी करण्यात येत आहे.
मलेशियात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका प्रवाशाच्या तपासणीत तो ओमिक्रॉनने बाधित असल्याचे आढळले आहे. तो काही दिवसांपूर्वी सिंगापूरच्या मार्गाने मलेशियात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सिंगापूरमध्येही फैलाव
दक्षिण आफ्रिकेतून सिंगापूरला आलेल्या दोन प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे आढळल्याने त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ओमिक्रॉन रुग्णांसाठी अनेक देशांना आता स्वतंत्र कक्ष निर्माण केले असून तेथेच रुग्णांवर उपचार केले जातात. अद्याप कोणामध्ये गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. तथापि, ज्यांनी दोन डोस घेऊन लसीकरण पूर्ण केले आहे, अशांनाही या रुपाची लागण होत आहे.
लस घ्या, नाहीतर लॉकडाऊनमध्ये रहा
अद्याप ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही, त्यांना लॉकडाऊनमध्ये रहावे लागेल, असा इशारा जर्मनीच्या प्रशासनाने दिला आहे. जर्मनीत अनेक लोकांनी लसीकरणालाही विरोध केल्याने त्या देशाने कठोर नियम अवलंबिण्यास प्रारंभ केला असून तेथे लसीकरण अनिवार्य बनविण्याचे धोरण लवकरच घोषित होईल.
अमेरिकेत पाच नवे रुग्ण
ओमिक्रॉनचे अमेरिकेत आणखी पाच रुग्ण गुरुवारी आढळले. त्यांच्यासह आता रुग्णसंख्या 7 झाल्याचे सांगण्यात आले. कॅलिफोर्निया प्रांतात 2 रुग्ण सध्या आढळले आहेत. त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते असे आढळून आले. अमेरिकेच्या एकंदर 5 राज्यांमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत.
नेपाळकडून कठोर निर्बंध
आफ्रिका खंडातील आठ देशांच्या प्रवाशांवर नेपाळने आपल्या देशात येण्यास बंदी घोषित केली. हाँगकाँगच्या प्रवाशांनीही नेपाळमध्ये येऊ नये असा आदेश काढण्यात आला. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, झिम्बाव्बे, लेसोथो, एस्वातिनी, मोझांबिक आणि मलावी या देशांतील प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली.
ओमिक्रॉनची लक्षणे डेल्टापेक्षा सौम्य
ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपावर जगभरात मोठे संशोधन होत आहे. या विषाणूची प्राथमिक लक्षणे डेल्टा या रुपाच्या लक्षणांपेक्षा सौम्य आहेत, असे प्रतिपादन दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञ डॉ. एंजेलिक कोएत्झी यांनी केल्sढ आहे. मात्र, अद्याप त्यांच्या या प्रतिपादनाला जगभरातील इतर संशोधकांनी दुजोरा दिलेला नाही. भारतातही या विषाणूच्या जनुकीय संरचनेसंबंधी अभ्यास होत आहे.
जॉन्सन यांनी घेतला बूस्टर डोस
एकदा कोरोनाबाधित झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. शुक्रवारी त्यांचे हा डोस घेत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. प्रत्येक नागरीकाने त्याचा क्रम आल्यानंतर बूस्टर डोस आवर्जून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ब्रिटनमध्ये गेल्या आठवडाभरात कोरोनाची विक्रमी संख्येने प्रकरणे दिसून आल्यानंतर त्या देशाने आणखी 1 कोटी 14 लाख लसी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे
ओमिक्रॉनची प्राथमिक लक्षणे
ड थकल्यासारखे वाटणे, अशक्तपणा जाणवणे
ड डोकेदुखी, अंगदुखी, फ्ल्यूची इतरही लक्षणे
ड ही लक्षणे तुलनेने सौम्य असल्याचा दावा
ड आणखी काही दिवसांनी चित्र स्पष्ट होणार









