कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
आरटीईअंतर्गत दरवर्षीप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यस्तरीय सोडत (लॉटरी) काढण्यात आली आहे. पहिल्या यादीत निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी महापालिका किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन आरटीई प्रवेश समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घ्यावयाची आहे. कागदपत्रे योग्य असतील तर ही समिती ऑनलाईन प्रवेश नोंदणी करून जे पत्र पालकांना देईल, ते पत्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर केल्यानंतर प्रवेश निश्चित होणार आहे. पालकांनी वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.
आरटीई प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील 328 शाळा यासाठी पात्र ठरल्या आहेत. यामध्ये एकूण 3 हजार 257 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या यादीत पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी शहरस्तरावर महापालिका तर तालुकास्तरावर 12 तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर पालकांनी पूरक कागदपत्रे घेऊन महापालिका किंवा पंचायत समितीत कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. ज्या शाळेत प्रवेश मिळाला त्या शाळेत पुढील प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. प्रवेश शुल्क सरकार भरत असले तरी शाळेतील इतर शुल्क मात्र पालकांनी भरावयाचे आहे.
- प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
विद्यार्थ्याचा जन्म दाखला, निवास प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा पासपोर्ट, रेशनकार्ड.
विद्यार्थ्याचे वय 6 ते 14 वर्षे असावे.
पालक गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असावेत
जात प्रमाणपत्र प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण आहे
उत्पन्नाचा दाखल, पालकांचा चालु वर्षातील उत्पन्नाचा दाखला.
- आरटीई अंतर्गत शाळा व नोंदणी शाळांची संख्या
तालुका शाळा पात्र शाळा
आजरा 10 4
भुदरगड 14 10
चंदगड 15 12
गडहिंग्लज 27 22
गगनबावडा 2 1
हातकणंगले 137 99
कागल 31 26
करवीर 63 40
कोल्हापूर 62 44
पन्हाळा 34 26
राधानगरी 17 11
शाहुवाडी 13 5
शिरोळ 54 28
एकूण 479 328








