दुर्गम भागात बालचमूंना मिळणार धडे : सक्षमीकरणाची मोहीम तीव्र : जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या 5556 वर
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात 325 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे बालचमूंची गैरसोय दूर झाली आहे. मागील महिन्याभरापासून या नवीन अंगणवाड्या विविध भागात भरू लागल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन अंगणवाड्या सुरू करण्यासाठी शासनाकडून हिरवाकंदील मिळाला होता. मात्र दोन महिने उशिरा का होईना नवीन अंगणवाड्यांना प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यामध्ये आता नवीन 325 अंगणवाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या 5556 वर पोहोचली आहे. यामुळे अंगणवाडी नसलेल्या परिसराचा प्रश्न मार्गी लागला आहे. सर्वसमावेशक बालविकास योजनेंतर्गत 400 ते 800 लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही काही भागात दोन हजारहून अधिक लोकसंख्या असूनही अंगणवाडी केंद्र नसल्याची बाब समोर आली आहे. नवीन 325 अंगणवाड्या सुरू करण्यात आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील अल्पउत्पन्नधारक आणि दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी वाड्या व वस्त्यांवर अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे दुर्गम आणि डोंगर भागातील बालचमू शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ लागले आहेत. सरकारकडून अंगणवाडी सक्षमीकरणाची मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जात असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे नवीन अंगणवाडी सेविकांनादेखील संधी मिळणार आहे.
बालचमूंच्या पालनपोषणाचा प्रश्नही मार्गी
ज्याठिकाणी अंगणवाडी केंद्रे नाहीत त्याठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे बालचमूंना आता जवळच्या अंगणवाडीत धडे गिरविता येणार आहेत. त्याबरोबरच बालचमूंच्या पालनपोषणाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
अद्यापही अंगणवाडी केंद्रांची गरज
जिल्ह्यात 325 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ज्याठिकाणी अंगणवाडी केंद्रे नव्हती त्याठिकाणी प्राधान्य देण्यात आले आहे. अद्यापही अंगणवाडी केंद्रांची गरज आहे. शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
– नागराज आर. (सहसंचालक, महिला व बालकल्याण खाते)









