रविवार पेठेतील खाडे दाम्पत्याची अनोखी कहाणी : 1990 मध्ये ब्रेन अॅटॅकने बदलले कृष्णात खाडेंचे जीवन : पत्नी कुसुम खाडेंच्या कष्टाने फुलवला संसार
संजीव खाडे / कोल्हापूर
28 मार्च 1985 या दिवशीच्या मुहुर्तावर रविवार पेठ बँकेजवळील गोविंद कृष्णात खाडे यांचा विवाह रायपूर (छत्तीसगड) येथील कुसुम देशमुख यांच्याशी झाला. प्लायवूडच्या दुकानात कष्ट करणारे गोविंद आणि घरकाम करणाऱ्या कुसुम सुखी संसाराची स्वप्ने पाहत होते. त्यांच्या सुखी संसार मुलगी नेहा आणि मुलगा निखिल यांच्या रूपाने लेकराचं आगमन झालं. सर्व काही सुरळीत सुरू होते. नेहा दोन तीन वर्षाची तर निखिल वर्षाचा होता. त्याचवेळी 1990 मध्ये एक काळा दिवस उजाडला. 30 वर्षीय गोविंद यांच्या लहान मेंदूला अचानकपणे झटका बसला. हा ब्रेन अॅटॅक इतका जोरात होता की गोविंद पूर्णपणे कोमात गेले आणि सहा आठ महिन्यांनी जेव्हा त्यांना शुद्ध आली, तेंव्हा त्यांचे संपूर्ण शरीर लुळे पडले होते. या दिवसापासून गोविंद गेली 32 वर्षे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांची पत्नी कुसुम यांनी केलेली सेवा आणि फुलवलेला संसार एका चित्रपटातील कथानकाला शोभेल असाच आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने कुसुम खाडे यांचा संघर्ष थक्क करणारा आहे.
कृष्णात खाडे अंथरुणाला खिळल्यानंतर त्याची सेवा कशी करायची? संसार कसा चालवायचा?, लहान नेहा, निखिलला कसे मोठे करायचे? असे असंख्य प्रश्न सौ. कुसुम खाडे यांच्यापुढे आ वासून उभे राहिले. रविवार पेठेतील रवि बँकेच्या शेजारी असलेल्या घरात पती, मुले आणि सासू सोनाबाई यांच्यासह कुसुम यांचा संघर्ष सुरू झाला. घराजवळच रविवार पेठ बाजार असल्याने कुसुम यांनी भाजी, पाला विक्री सुरू केली. भागातील लोकांच्या चटणी मिसळून देण्याचा व्यवसाय सुरू केला. सासू सोनाबाई सोबत असल्याने आधार होता. एकाकी लढणाऱ्या कुसुम यांना रविवार पेठ तरुण मंडळाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कायमपणे साथ दिली. मुले लहान असताना कृष्णात यांना दवाखान्यात नेणे असो वा इतर कामे असोत मंडळाचे कार्यकर्ते धावून येत असत. पतीची सेवा-सुश्रुषा आणि संसाराचा गाडा ओढत हळूहळू महिने गेले, वर्षे गेली, मुलगी नेहाचा विवाह झाला. मुलगा निखिलचेही लग्न झाले. दरम्यान, 2014 ला सोनाबाईंचे वृद्धापकाळाने निधन झाले. अंथरुणावर पडलेल्या कृष्णात यांनी आई गमावली, कुसुम यांनी साथ देणारी सासू गमावली. तरीही त्यांना खचल्या नाहीत. त्यांचा संघर्ष मुलगा, मुलगी, सून, जावई यांच्या साथीने सुरूच राहिला. निखिलला झालेला मुलगा नातू पृथ्वीराजला पाहण्याचे भाग्य कृष्णात यांना लाभले. आज ते 32 वर्षे अंथरुणाला खिळून असले तरी आनंदी आहेत. निखिल आणि त्याची पत्नी मेघा हे दोघे दूध, बेकरी आणि भाजापाला विक्रीचा व्यवसाय करतात. कुसुम या कृष्णात यांच्या सेवेत आहेत. कृष्णात यांना रक्तदाब, मधुमेह वा इतर कोणताही आजार नाही. सर्व प्रकारचे भोजन ते वेळेत घेतात. समोरच्या व्यक्तीने बोललेले त्यांना कळते. पण बोलता येत नसल्याने हातवारे करून ते आपल्याला काय हवे ते सांगतात, प्रतिसाद देतात. पत्नी कुसुम आणि आई (कै.) सोनाबाईंच्या सेवा-सुश्रुषेमुळे त्यांची जीवनाची दोरी चांगलीच घट्ट झाली आहे. आता मुलगा, सून आणि नातू देखील सेवा करतात, आनंद देतात. 32 वर्षांत कुसुम कुणाही नातेवाईकाकडे कधीही गेलेल्या नाहीत. त्यांच्यासाठी कृष्णातरावांची सेवा हाच दिनक्रम नव्हे तर श्वास बनला आहे. महिला दिनी जीवनाच्या रणात लढणाऱ्या रणरागिणीला आपण केवळ सलाम, सॅल्युटच करू शकतो.