विदेशातून खरेदी केलेला कोळसा भारतात झाला महाग : काँग्रेस नेत्याकडून अदानी समूह लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उद्योजक गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी अदानींकडून 32 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला आहे. देशात महागड्या वीजेसाठी अदानी कारणीभूत असून ते जनतेच्या खिशातून पैसे लुटत असल्याचा दावा राहुल यांनी बुधवारी केला आहे.
अदानींकडे असे काय आहे ज्यामुळे सरकार त्यांची चौकशी करणे टाळत आहे. अदानी यांना जे हवे ते मिळून जाते. अदानींमागे कुणाची शक्ती आहे अशी विचारणा करत राहुल गांधी यांनी भाजप सरकारला घेरले आहे. राहुल गांधी हे बुधवारच्या पत्रकार परिषदेत अदानी समुहावरून चांगलेच आक्रमक दिसून आले.
अदानी समुहावर आरोप करत राहुल गांधी यांनी एका वृत्त अहवाल दाखविला आहे. अदानी हे इंडोनेशियात कोळसा खरेदी करतात आणि भारतात हा कोळसा पोहोचेपर्यंत या कोळशाची किंमत दुप्पट होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
कोळशाचे दर वाढवून सांगण्यात आल्याने भारतात वीज महाग झाली आहे. कर्नाटकात काँग्रेसने वीज अनुदान दिले असून मध्यप्रदेशातही आम्ही देणार आहोत. जनतेचे विजेचे बिल जे वाढतेय, त्याचा पैसा थेट जनतेच्या खिशातून अदानींच्या खिशात पोहोचत आहे. अदानींनी अशाप्रकारे सुमारे 12 हजार कोटी रुपये थेट हिंदुस्थानच्या नागरिकांच्या खिश्यातून काढल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सेबीला का मिळत नाहीत दस्तऐवज?
सेबीने सरकारला दस्तऐवज मिळत नसल्याचे कळविले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे फायनान्शियल टाइम्सकडे पुरावे आहेत, परंतु तपास यंत्रणेकडे नाहीत. यातून मोठ्या पदांवर बसलेल्या लोकांकडून अदानी समुहाला संरक्षण प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. भारताच्या पंतप्रधानांच्या सहमतीशिवाय असे घडू शकत नाही. अदानी विरोधात कुठलीच कारवाई का करण्यात आली नाही यावर पंतप्रधान टिप्पणी करत नसल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.
भारतीय माध्यमांना नाही रस
घोटाळ्याचे वृत्त समोर आल्यावरही देशातील प्रसारमाध्यमे एकही प्रश्न विचारत नाहीत. विजेचा विषय आहे, गरीबांचा विषय, घोटाळ्याचे प्रकरण असूनही भारतीय प्रसारमाध्यमांना यात रस नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
शरद पवार पंतप्रधान नव्हेत
पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी यांच्या भेटीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर राहुल गांधी यांनी शरद पवारांना याबाबत विचारणा केली नसल्याचे सांगत पवार हे काही देशाचे पंतप्रधान नव्हेत असे उद्गार काढले आहेत. शरद पवार हे अदानी यांना वाचवू पाहत नाहीत. पंतप्रधान मोदी अदानींना वाचवत आहेत. शरद पवार हे जर पंतप्रधान असते तर त्यांना याबद्दल प्रश्न विचारले असते अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे.
प









