मृतांमध्ये 6 मुलांचा समावेश
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझापट्टीमध्ये एका दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर खालिद मंसूरचा शनिवारी रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. या संघर्षात पॅलेस्टाइनमधील कमीतकमी 32 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 6 मुलांचा देखील समावेश आहे. इस्रायलने वेस्ट बँकेत दहशतवादी गटाच्या 20 सदस्यांना अटक केली आहे. दीर्घकाळानंतर इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी यांच्यात भडकलेल्या या हिंसेत शेकडो रॉकेट्स डागण्यात आली आहेत.
गाझामध्ये हिंसेत मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या वाढून 32 झाली आहे. या हल्ल्यांमध्ये 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत असा दावा पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. एका दहशतवादी गटाच्या विरोधात इस्रायलने कारवाई सुरू केली आहे. या दहशतवादी गटाने जेरूसलेमच्या दिशेने रॉकेट्स डागली आहेत.









