बुडालेल्या जहाजात 1.66 लाख कोटी डॉलर्सचा 200 टन खजिना : 4 देशांच्या दाव्यामुळे वाद
वृत्तसंस्था/ बोगोटा
कोलंबियाच्या सरकारने 315 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाला कॅरेबियन समुद्रातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. बुडण्यापूर्वी सॅन होजे नाव असलेल्या या जहाजावर सोन्याचांदीसह 1 लाख 66 हजार कोटी डॉलर्सचा 200 टन खजिना होता असे मानले जाते. 1708 मध्ये हे जहाज किंग फिलिप पाचव्या यांच्या ताफ्याचा हिस्सा होते.
स्पेनवर विजय मिळविण्याच्या युद्धादरम्यान ब्रिटिश नौदलाच्या हल्ल्यात सॅन होजे जहाज बुडाले होते, तेव्हा या जहाजावर 600 लोक होते आणि यातील केवळ 11 जणच वाचू शकले होते. 2015 मध्ये कोलंबियन नौदलाच्या पाणबुड्यांनी जहाजाचे अवशेष पाण्यात 31 हजार फुटांखाली आढळून आले होते. तेव्हा या शोधाला कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सँटोस यांनी मानवी इतिहासातील सर्वात मूल्यवान खजिना संबोधिले होते.
सॅन होजे जहाजाच्या अवशेषांना पवित्र कब्र देखील म्हटले जाते. या जहाजाच्या अवशेषांवरून स्पेन, कोलंबिया आणि बोलीवियाच्या कहारा समुदायाच्या लोकांमध्ये वाद आहे. आमच्या लोकांना खजिन्याच्या खननासाठी भाग पाडण्यात आले होते, याचमुळे हा खजिना आमचा असल्याचा दावा बोलीवियन समुदायाचा आहे. याचबरोबर ग्लोका मोरा नावाने ओळखला जाणारा एक अमेरिकन बचाव टीमने देखील 1981 मध्ये जहाज शोधल्याचा दावा केला होता. निम्मा खजिना देण्याच्या अटीवर या अवशेषांचे लोकेशन कोलंबियन सरकारला सांगितले होते असे ग्लोक मोराकडून सांगण्यात आले आहे.
2026 पूर्वी बाहेर काढणार अवशेष
आमच्या नौदलाने दुसऱ्या लोकेशनवर जहाजाचे अवशेष शोधून काढले आहेत असे कोलंबियाने 2015 मध्ये सांगितले होते. तर राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो हे 2026 मध्ये स्वत:चा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी हे अवशेष समुद्रातून बाहेर काढू इच्छितात. अवशेषांसाठी एक लॅब तयार केली जाणार असून तेथे या जहाजावर अध्ययन केले जाईल. यानंतर हे अवशेष राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात येतील असे पेट्रो सरकारने म्हटले आहे. मागील वर्षी पाणबुड्यांनी अवशेषांशी निगडित अनेक छायाचित्रे मिळविली होती. यात शेकडो सागरी जीवांदरम्यान जहाजाच्या अवशेषांसोबत सोन्याची नाणी, सोन्याच्या विटा आणि इतर मूल्यवान सामग्री दिसून आली.
कशामुळे बुडाले जहाज?
सॅन होजे 62 हे जहाज 1708 साली 600 लोकांसोबत बुडाले होते. हे जहाज 16-17 व्या शतकादरम्यान युरोप आणि अमेरिकेदरम्यान सागरी प्रवास करायचे. बुडण्यापूर्वी या जहाजामधून अमेरिकेतील खजिना स्पेनच्या दिशेने नेण्यात येत होता. या खजिन्याचा वापर स्पेन ब्रिटनच्या विरोधातील युद्धात करणार होता. सॅन होजे गॅलियन 14 जहाज आणि तीन स्पॅनिश युद्धनौकांच्या ताफ्याचे नेतृत्व करत पनामाच्या पोर्टोबिलो येथून रवाना झाले होते. तेव्हा याचा सामना एका ब्रिटिश स्क्वाड्रनशी झाला होता. 8 जून 1708 रोजी रॉयल नेव्हीच्या कोमोडोर चार्ल्स वेगरने या जहाजाला बारूनजीक कार्टाजेनापासून 16 मैल अंतरावर ट्रॅक केले होते. यानंतर हे जहाज आणि त्यावरील सामग्री ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु जहाजावरील दारुगोळ्याचा विस्फोट होत ते बुडाले होते.









