शैक्षणिक संस्थेला माजी विद्यार्थ्याकडून मोठे दान
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणि यांनी इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईला 315 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. नीलेकणि यांनी ही देणगी आयआयटीमधून उत्तीर्ण झाल्याच्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिली आहे. नीलेकणि यांनीच सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे.
नीलेकणि यांनी यापूर्वीही आयआयटी मुंबईला 85 कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या या दोन्ही देणग्यांना एकत्र केल्यास ही रक्कम 400 कोटी रुपये इतकी होते. देशाच्या कुठल्याही शैक्षणिक संस्थेला त्याच्या माजी विद्यार्थ्याकडून देण्यात आलेली ही सर्वात मोठी देणगी ठरली आहे.
संशोधनावर खर्च करावे लागणार
आयआयटी मुंबईने मंगळवारी एक पत्रक जारी करत नीलेकणि यांच्या देणगीचा उद्देश जागतिक स्तराच्या मूलभूत सुविधांना चालना देणे असल्याचे म्हटले आहे. तसेच इंजिनियरिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा हेतू आहे. आयआयटी मुंबईत एक बेस्ट टेक स्टार्टअप इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी ही रक्कम खर्च केली जाणार आहे.
50 वर्षांचे संबंध
आयआयटी मुंबई हे माझ्या आयुष्याचा पाया रचणारे राहिले आहे. या संस्थेने माझ्या कारकीर्दीच्या प्रारंभिक वर्षांना आकार दिला आणि माझ्या प्रवासाचा पाया रचला. मी या प्रतिष्ठित संस्थेसोबत 50 वर्षांपूर्वी जोडला गेला होता असे नीलेकणि यांनी म्हटले आहे. नीलेकणि यांनी 1973 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त करण्यासाठी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला होता.
माझी मानवंदना
आयआयटी मुंबईला दिलेली ही देणगी एक आर्थिक योगदान नाही, ज्या जागेने मला बरंच काही दिलं, त्याकरता माझी ही मानवंदना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देणगीसाठी नीलेकणि आणि आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक सुभाशीष चौधरी यांनी बेंगळूर येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. ही ऐतिहासिक देणगी आआयटी मुंबईला जागतिक नेतृत्वाच्या मार्गावर मजबूतीने स्थान मिळविण्यास मदत करणार आहे. आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी नंदन नीलेकणि यांच्या योगदानामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत असे चौधरी यांनी म्हटले आहे.









