मद्याऐवजी लोकांना दिले मेथेनॉल ः मुख्य आरोपीसह 14 जणांना अटक
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातच्या बोटाद जिल्हय़ात विषारी दारूचे प्राशन केल्याने आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 28 जणांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी विषारी दारूच्या प्राशनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर मंगळवारी उपचारादम्यान आणखी 21 जणांवर मृत्यू ओढवला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह 14 जणांना अटक करण्यात आली आहे. तर एसआयटीने तपासाला वेग देत अनेक पावले उचलली आहेत.
बरवाला येथील रोजिंद गावात एका दारूच्या भट्टीवर 8 गावातील लोक मद्यप्राशनासाठी पोहोचले होते. परंतु मद्याऐवजी तेथे लोकांना मेथेनॉल हे रसायन देण्यात आले. हे मेथेनॉल अहमदाबाद येथून आणले गेले होते.
रोजिंद गावात 9 जणांवर अंत्यसंस्कार
विषारी दारूचे प्राशन केल्याने मृत्युमुखी पडलेल्या लोकांवर मोकळय़ा जमिनीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वाधिक रोजिंद गावात 9 जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. विषारी मद्यप्राशनाच्या प्रकारामुळे रेस चौकडी, धंधुका, नभोई, रणपरी, पोलरपूर आणि चौरागा तसेच रोजिंद गावात शोककळा पसरली आहे.
विषारी मद्यप्राशनामुळे लोकांचा मृत्यू होण्याचा प्रकार दुःखद तसेच लाजिरवाणा आहे. दारूबंदी असूनही राज्यात मद्य कसे आणि कोण विकतोय याची आम्ही चौकशी करणार आहोत. दोषी पोलीस अधिकाऱयांवरही कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हय़ाचे पालक मंत्री वीनू मरोदिया यांनी म्हटले आहे.
विषारी मद्य आले कोठून?
दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी मद्य आले कोठून? सरकारने पोलीस उपअधीक्षकांना चौकशीची जबाबदारी दिली आहे. परंतु पोलिसांची भूमिकाच संशयास्पद असल्याने निष्पक्ष चौकशी कशी होणार असे विधान काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल यांनी केले आहे.
गुजरातमध्ये 1960 पासून दारूबंदी
गुजरातमध्ये 1960 पासून दारूबंदी लागू आहे. 2017 मध्ये गुजरात सरकारने दारूबंदीशी निगडित कायदा आणखी कठोर केला होता. याच्या अंतर्गत कुणी दारूबंदी करत असल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा आणि 5 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.









